भारताला जागतिक प्लास्टिक हब बनवण्याचे राष्ट्रीय मिशन – अरविंद मेहता
मुंबई –जागतिक स्तरावर १,३०० अब्ज डॉलर्सच्या प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्स बाजारपेठेत भारताचा वाटा केवळ १२.५ अब्ज डॉलर्स (०.९६%) इतकाच आहे. हा हिस्सा वाढवून पुढील तीन वर्षांत निर्यात चौपट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, भारताला जागतिक प्लास्टिक हब बनवणे हा राष्ट्रीय मिशन असल्याचे प्रतिपादन ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIPMA) चे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन अरविंद मेहता यांनी केले.
हॉटेल ललित, मुंबई येथे २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या “इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन बूस्ट इंडियाज एक्सपोर्ट ऑफ प्लॅस्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्स – अ ग्लोबल सोर्सिंग हब” या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी AIPMA अध्यक्ष मनोज शाह, उपाध्यक्ष बिपीन देसाई, सुनील शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

मेहता यांनी सांगितले की “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” या ध्येयातून भारताची प्लास्टिक उत्पादने निर्यात चौपट करण्याची तयारी आहे. ही रणनीती केवळ व्यापार विस्तारासाठी नसून देशाच्या जागतिक नेतृत्वासाठी महत्त्वाची ठरेल.
AIPMA अध्यक्ष मनोज आर. शाह यांनी स्पष्ट केले की, या रणनीतीमुळे MSME क्षेत्रासाठी ऐतिहासिक संधी उपलब्ध होईल. सध्या भारतात ५०,००० हून अधिक MSMEs कार्यरत असून ४.६ दशलक्ष रोजगारनिर्मिती झाली आहे. निर्यात लक्ष्य साध्य झाल्यास रोजगार संधी ६ दशलक्षांपर्यंत वाढतील.
AIPMA च्या Export Cell ने २१ देश व ९ HSN कोड्सचा अभ्यास केला असून, भारताकडे गुणवत्ता व स्पर्धात्मक किमतीमुळे चीन (२२% हिस्सा) व व्हिएतनाम (४% हिस्सा) यांच्याशी जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील ७२.३५ अब्ज डॉलर्स आयातीमध्ये भारताचा वाटा केवळ १.२% असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारताच्या निर्यात उद्दिष्टासाठी AIPMA ने आतापर्यंत तीन आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या असून, दिल्ली (१७ जुलै) आणि अहमदाबाद (२२ ऑगस्ट) नंतर तिसरी परिषद मुंबईत होणार आहे. तसेच मार्च २०२६ मध्ये मुंबईत “PlastiWorld 2026 Exhibition” ही जागतिक प्रदर्शनी आयोजित केली जाणार असून ती केवळ प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्ससाठी समर्पित असेल.

AIPMA च्या Arvind Mehta Technology & Entrepreneurship Centre (AMTEC) मार्फत तरुण पिढीला प्रशिक्षण, प्रोटोटायपिंग, टूल डिझाइन व नवोन्मेषासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. प्लास्टिक उद्योग आता उत्पादनापुरता मर्यादित न राहता गुणवत्ता व नवोन्मेषाचे प्रतीक बनत असून, योग्य शासकीय समर्थन मिळाल्यास भारत “प्लास्टिकचा विश्वगुरू” होऊ शकतो, असे AIPMA पदाधिकाऱ्यांनी सांगितले.



