राम गोपाल वर्मा आणि मनोज वाजपेयी ‘सत्या’नंतर पुन्हा एकत्र

मुंबई – जवळपास तीन दशकांनंतर इतिहास घडवणाऱ्या सत्या चित्रपटानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि अभिनेता मनोज वाजपेयी पुन्हा एकत्र येत आहेत. निमित्त आहे एका भन्नाट हॉरर कॉमेडी चे. आणि हे कथानक घडते ते चक्क पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस स्टेशनमध्ये भूत या अनोख्या चित्रपटामध्ये मनोजसोबत जेनेलिया डिसूझा देखील झळकणार असून, या प्रोजेक्टबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असून, त्याचे पहिले शेड्यूल पूर्णही झाले आहे. भीती, व्यंग्य आणि आरजीव्हीच्या खास कथाकथन शैलीचा संगम या चित्रपटात प्रेक्षकांना थरारक प्रवासाची झलक घडवेल. या चित्रपटाच्या केंद्रस्थानी एक रोचक प्रश्न आहे जो सुरक्षिततेच्या संकल्पनेलाच उलथवतो:
“आपण घाबरलो की पोलीस स्टेशनकडे धाव घेतो — पण जेव्हा पोलीसच घाबरले तर ते कुठे पळतील?”

चित्रपटाबद्दल बोलताना राम गोपाल वर्मा म्हणाले,*“सत्या नंतर मनोजसोबत पुन्हा काम करणं हे एकाचवेळी नॉस्टॅल्जिक आणि रोमांचक आहे. भीती तेव्हाच खरी भीषण होते जेव्हा ती सुरक्षिततेच्या सर्वोच्च प्रतीकाला आव्हान देते, आणि सर्व सामान्यांसाठी पोलीस स्टेशन म्हणजे शक्तीचं ते अंतिम ठिकाण आहे”.
मनोजची आक्रमकता आणि जेनेलियाची निरागसता यांच्यासोबत ही कथा त्या सीमारेषा मोडेल, जिथे आपण सत्तेच्या आवरणात दडलेली भीती समजतो.”*
दोन दिग्गजांची ही पुनरागमनाची जोडी आणि इतकी आगळीवेगळी थीम यामुळे पोलीस स्टेशनमध्ये भूत हा आधीच उत्सुकतेचा विषय ठरला नसल्यास नवल.



