आरोग्यमहाराष्ट्रविशेष
Trending

Heart Health 2026 : हृदयविकार रोखण्यासाठी पुण्यात देशभरातील तज्ज्ञ एकाच व्यासपीठावर

‘हृदयम् २०२६’ राष्ट्रीय परिषद २९ नोव्हेंबरला फर्ग्युसन महाविद्यालयात; तीन हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याचा अंदाज

पुणे : हृदयविकारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आणि हृदयविकार होऊच नयेत, यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर चर्चा करण्यासाठी पुण्यात ‘हृदयम् २०२६’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २९ नोव्हेंबर रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात ही परिषद होणार असून, देशभरातील विविध चिकित्सा पद्धतींमधील तज्ज्ञ एकत्र येऊन हृदयाच्या आरोग्याबाबत विचारमंथन करणार आहेत.

आरोग्य भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे भागीरथी मेडिकल फाउंडेशन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे ऑनलाइन सत्र २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ‘एक हृदय, अनेक शाखा, एकच ध्येय’ ही या परिषदेची संकल्पना आहे.

उपचारांसोबत प्रतिबंधावरही भर

हृदयविकारांवरील उपचारांबरोबरच ते टाळण्यासाठी काय करता येईल, यावर परिषदेत भर दिला जाणार आहे. ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, फिजिओथेरपी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फार्मसी आणि सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रांतील तज्ज्ञ सहभागी होतील. आधुनिक तंत्रज्ञानाचाही आरोग्यसेवेत कसा उपयोग करता येईल, यावर चर्चा होणार आहे.

विविध चिकित्सा पद्धतींमधील तज्ज्ञांनी एकमेकांच्या अनुभवांचा उपयोग करून रुग्णांना अधिक चांगली सेवा द्यावी, तसेच उपचारांमध्ये समन्वय वाढावा, हा परिषदेचा उद्देश आहे. रुग्णांच्या हिताला प्राधान्य देतानाच शास्त्रीय पुराव्यांवर आधारित उपचारपद्धतींना प्रोत्साहन देण्यावरही भर दिला जाणार आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन

परिषदेच्या उद्घाटनाला राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती आयोगाच्या (एनसीआयएसएम) अध्यक्षा डॉ. मनीषा कोठेकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते, ‘मारबिसम’चे अध्यक्ष डॉ. मुकुल पटेल आणि आरोग्य भारतीचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुनील जोशी उपस्थित राहणार आहेत.

परिषदेच्या शास्त्रीय सत्रांमध्ये पुण्याचे डॉ. सुहास हरदास, बेळगावचे डॉ. राजशेखर व्ही. सनापेती, पालघरचे डॉ. बिपिन एस. जैन, बेंगळुरूच्या डॉ. सविता रवींद्र आणि नाशिकचे डॉ. गांधार मंडलिक मार्गदर्शन करणार आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी संशोधन निबंध, ई-पोस्टर, वैज्ञानिक मॉडेल आणि रील्स स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांसाठी १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान अर्ज करता येणार आहेत. तसेच हृदयाच्या आरोग्याशी संबंधित नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाची माहिती देणारे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.

या परिषदेत तीन हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. वैद्यकीय व्यावसायिक, प्राध्यापक आणि नागरिकांनी परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आयुर्वेद सेवा संघ ही या राष्ट्रीय परिषदेची सहयोगी संस्था आहे.

नोंदणीसाठी संपर्क : ८२७५३८७८९७, ९४२२११५८४४, ९५५२५०९०५२ किंवा ९४०४३३६१३१.

वैद्य संतोष गटणे, डॉ. मनोज चौधरी, डॉ. देवदत्त देशमुख, डॉ. शरद आगरखेडकर, डॉ. गिरीश कामत, दीपक अष्टपुत्रे आणि अमेय वाघ यांनी ही माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button