महाराष्ट्रविशेषशहर
Trending

कल्याण–मुरबाड मार्गावर प्रवाशांचा ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई – परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारामुळे कल्याण–मुरबाड मार्गावरील एसटी बससेवेत करण्यात आलेली फेऱ्यांची वाढ प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरली असून, या निर्णयाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाढीव फेऱ्यांमुळे प्रवासीसंख्या आणि बसची सरासरी भराव क्षमता लक्षणीयरीत्या वाढल्याचे एसटीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी, ५ मे २०२६ पर्यंत कल्याण आगारातून या मार्गावर दररोज ४८ फेऱ्या (ये-जा) चालवल्या जात होत्या. त्यावेळी दररोज सरासरी २,२३८ प्रवासी या सेवेचा लाभ घेत होते. मात्र, वाढत्या प्रवासीसंख्येमुळे या फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. अपुऱ्या एसटी सेवेमुळे अनेक प्रवासी नाईलाजाने अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घेत होते. याच पार्श्वभूमीवर घडलेल्या एका दुर्दैवी प्राणांतिक अपघाताची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी स्वतः लक्ष घालून या मार्गावरील एसटी फेऱ्या तातडीने वाढविण्याचे निर्देश दिले.

या निर्णयानंतर कल्याण–मुरबाड मार्गावरील फेऱ्यांची संख्या ४८ वरून थेट १०८ करण्यात आली. परिणामी, आज या मार्गावर दररोज सरासरी ५,०८० प्रवासी एसटी सेवेचा लाभ घेत आहेत. म्हणजेच प्रवासीसंख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेसही सेवेत दाखल करण्यात आल्या असून, त्यालाही नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे.

याशिवाय, कल्याण–मुरबाड मार्गावरून पुढे उंबर, अहिल्यानगर आदी भागांकडे जाणाऱ्या विविध आगारांच्या एसटी बसमध्येही मुरबाड–सरळगाव परिसरातील प्रवाशांना चढ-उताराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर झाली असून, एसटी सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख बनली आहे.

याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि वेळेवर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे हे एसटीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या मार्गांवर प्रवाशांची मागणी वाढत आहे, त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करून नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार सेवा देण्याचा आमचा प्रयत्न सातत्याने सुरू राहील. एसटी ही सामान्य जनतेची जीवनवाहिनी असून, तिचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button