वडाळ्यात मुस्लिम समाजाचे भव्य रक्तदान शिबिर; २५५ हून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप आमदार कालिदास कोळंबकर आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे मुंबई अध्यक्ष वसीम खान यांच्या वतीने वडाळा येथे मुस्लिम समाजासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला मुस्लिम महिला आणि पुरुष रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. या शिबिरात २५५ हून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष इलियाज मनावर यांच्या माध्यमातून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवकांसह महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितले. रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभी राहावी आणि गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वधर्म समभाव आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याचेही कोळंबकर यांनी सांगितले. नागरिकांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वी झाले असून, संकलित रक्तामुळे अनेक गरजू रुग्णांना मदत मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या शिबिराला विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, सामाजिक संस्था तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.



