महाराष्ट्रविशेष

उबाठा व्होट दरोडेखोर-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

मुंबई: शिवसेना भाजप युतीला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत असताना तुम्ही महाविकास आघाडीसोबत सरकार बनवलं तीच सर्वात मोठी व्होट चोरी होती, असा घणाघात शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केला. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनलेले उबाठा व्होट दरोडेखोर आहेत, अशी खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित शिवसेनेच्या हिरक महोत्सवी दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्होट चोरी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस उबाठासह इंडि आघाडीतील विरोधी पक्षांवर आज सडकून टीका केली. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालात शिवसेना भाजप युतीला बहुमत असताना मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेससोबत गेलेले उबाठाच खरे व्होट दरोडेखोर आहे. महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात. काँग्रेसने ७० वर्ष देशाला लुटले. मतदान केंद्र ताब्यात घेऊन काँग्रेस निवडणुका जिंकत आली ती व्होटचोरी नव्हती का, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. विधानसभेत मतं वाढली, मतदार याद्या स्वच्छ करा यासाठी मोर्चे काढणारे आता मतदार कमी झाले म्हणतात. इंडि आघाडी हा दहा तोंडाचा रावण असून जनता त्याचे दहन केल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंकेचे उदाहरण देऊन तुम्ही देशात अराजक आणि अशांतता पसरवण्याचे काम विरोधकांना त्यांनी ठणकावले. नेपाळ, बांग्लादेश किंवा पाकिस्तान नाही तर शत्रूंच्या घरात घुसून मारणारा नवा भारत आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, तुम्ही रोज आम्हाला शिव्या द्या आम्ही शेतकऱ्यांना शिधा देऊन त्यांचे तोंड गोड करु. आम्ही भाषण देणारे नाही तर शेतकऱ्यांची चूल पेटवणारे, रेशन देणारे आहोत, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. ऑपरेशन सांगून करत नाही, नो डेट ऑपरेशन थेट असे ते म्हणाले. ऑपरेशन करण्याची गरज नाही. का लोक तुम्हाला सोडून जातात याचे आत्मपरिक्षण करा, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला.

दुष्काळात ५००० रुपयांत शेतकऱ्यांचे काय होणार या विरोधकांच्या आरोपांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाचार घेतला. ट्रक भरुन मदत पाठवायला हिंमत लागते, मोठं मन लागतं. तुम्ही साधा एक बिस्किटचा पुडा तरी दिला का, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. शेतकऱ्यांच्या संकटाचे तुम्ही राजकारण करता, त्यांच्या जखमेवर मीठ चोळताय. राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे, तसाच एकनाथ शिंदेवरही शेतकऱ्यांचाच पहिला हक्क आहे, असे ते म्हणाले. शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत शेतकऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, लंडनमध्ये जाऊन मराठीचा डंका वाजवला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला तरी उबाठाला पोटदुखी झाली. महाराष्ट्राचा विकासाचे ब्रिटीश पार्लमेंटमध्ये ब्रॅंडिंग केले. महाराष्ट्र आणि देश कसा पुढे चाललाय हे बोललो. मराठीत बोललो तरी पोटदुखी, इंग्रजीत बोललो तरी पोटदुखी, गावाला गेलो, दिल्लीत गेलो किंवा लंडनला गेलो तरी तुम्हाला पोटदुखी होते. गावाला गेलो की जळजळ, दिल्लीला गेलो की मळमळ आणि लंडनला गेलो की त्यांना अँसिडीटी झाली अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली.

रिजीम चेंजची भाषा करणाऱ्यांना जनतेने तीन वेळा रिजेक्ट केले

‘रिजीम चेंज’ची भाषा करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खडेबोल सुनावले. तुम्ही काय रिजीम चेंज करणार, तुमच्या पक्षातले रिजीम चेंज झाले तेही तुम्हाला कळले नाही. तुम्हाला जनतेने एकदा नव्हे तर तीन वेळा नाकारले. आणिबाणीच्या काळात पत्रकारांना बंदी होती, न्यायालयाचे हात बांधलेले होते, आता तसे नाही. दिल्लीत दररोज मोर्चे निघत आहेत, ही इर्मजन्सी नाही तर लोकशाही आहे, असे ते म्हणाले.

चौकट २

पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ३६ देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केला. एकही दिवस सुट्टी न घेणाऱ्या प्रधानमंत्र्यांवर खालच्या पातळीवर टीका करतात. पण १४० कोटी जनता तुम्हाला माफ करणार नाही. दुष्काळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत, अशी ग्वाही दिली. दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथके आली, सर्व्हे झाला, असे ते म्हणाले.

चौकट ३

राहुल गांधींकडून सर्वोच्च न्यायालयाचा अपमान

विरोधी पक्ष नेता असलेले राहुल गांधी सुप्रीम कोर्टावर मोर्चा नेतात हा भारताच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेचा अपमान आहे. एका हातात संविधान घ्यायचे आणि डॉ. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या घटनात्मक संस्थांवर हल्ले करायचे. विरोधक देश तोडायला निघालेत, अशी टीका त्यांनी केली.

चौकट ४

स्मित मच्छारच्या शौर्याबाबत इंडि आघाडीला द्वेष

कॅप्टन स्मित मच्छारने स्वत:चा जीव धोक्यात घालून १७४ लोकांचे प्राण वाचवले. त्याचे जगभर कौतुक झाले. त्याने सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रेरणास्थान आहेत. इथंही विरोधकांनी करंटेपणा दाखवला, त्यांनी कॅप्टन स्मित मच्छारच्या शौर्याचे कौतुक नाही केले. ही देशभक्ती नाही तर देशद्रोह आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी इंडि आघाडीवर केला. ते पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर टीका करतात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका करतात. देशभक्त नागरिक रस्त्यावर उतरला तर तुमची पळता भुई थोडी होईल, असा इशारा त्यांनी यावेळी विरोधकांना दिला. उमर खालिद, शर्जील इमाम हे काँग्रेसचे आयडॉल आहेत, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

विरोधक तरुणांना भडकवण्याचे काम करतायेत

तरुणाईला भडकवण्याचा धंदा काहीजणांनी सुरु केलाय, मात्र तरुणांच्य उज्ज्वल भविष्याकडे पाहिले पाहिजे. पंतप्रधान तरुणांना प्रोत्साहन देत आहे. पालकमंत्री असताना गडचिरोलीत कौशल्य विकास केंद्र सुरु केले. आज दरवर्षी ५००० तरुण ट्रेनिंग घेत आहेत, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, शेकडो ट्रक दिवाळीचा शिधा रवानाउपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज हिरक महोत्सवी दसरा मेळावा आहे, मात्र आपला लाडका शेतकरी संकटात आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याची सूचना केल्याचे ते म्हणाले. ही वेळ राजकारणाची नाही तर शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याची आहे, असे ते म्हणाले. भगवा घेऊन खांद्यावर शिवसैनिक दिसेल बांधावर या विचाराने आज शिवसेनेकडून आज १०० ट्रक दिवाळीचा शिधा दुष्काळी भागासाठी रवाना झाले. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. आणखी शेकडो ट्रक रवाना होतील, असे ते म्हणाले. आज बाळासाहेब दिघे साहेब असते तर तेही म्हणाले असते सण उत्सव बाजुला ठेवा आणि शेतकऱ्यांच्या मदतीला धावा असे बोलले असते, शिवसेना तेच करत आहेत. जिथे संकट तिथे शिवसेना, जिथे आपत्ती तिथे एकनाथ शिंदे हे समीकरण आहे. आज शिवसेनेचे १५ खासदार, ७४ आमदार, ६३ नगराध्यक्ष, ११०० नगरसेवक आहेत ही शिवसेनेची ताकद आहे. हा विजय शिवसैनिकांनी मिळवून दिलेला आहे. व्यासपीठावर बसलेलं पक्षाचं वैभव आणि समोर बसलेला ऐश्वर्य आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या पत्नींना २५ हजार शिलाई मशीनचे वाटप सुरु केले. शेतकऱ्यांच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी २५ हजार सायलक वाटप सुरु केले. ज्या शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह ठरलेत त्यांचे विवाह करुन देण्याचा निर्धार पक्षाने केलाय, असे ते म्हणाले. शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याला धीर देण्याचे आणि मदतीचे काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button