देश-विदेशमहाराष्ट्रसंपादकीय
Trending

पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा

नवी दिल्ली – जंतर मंतरवरील आंदोलनानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारुन धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. तिथले आंदोलन संपले मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआडून विरोधी पक्ष गृहमंत्री अमित शाहांचा राजीनाम्यासाठी संसदेबाहेर राजकीय स्टंट करत आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर सुमारे तासभर चर्चा झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेना संसदीय पक्षाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार संजय देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार ज्योती वाघमारे, खासदार संजय दिना पाटील यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या खासदारांना पंतप्रधानांनी सकाळी चहापानासाठी बोलवले होते. यावेळी काळजी करु नका, मतदार संघातील विकास कामांवर लक्ष द्या, अशी ग्वाही पंतप्रधानांनी शिवसेना खासदारांनी दिली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सरकार संसदेत चर्चेसाठी तयार असताना विरोधक मात्र केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनाम्यासाठी संसदेबाहेर राजकीय स्टंट करत आहेत. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असताना काँग्रेसने मात्र षडयंत्र रचत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या निवासस्थानी निदर्शने केली. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारुन धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. ज्यांचे आंदोलन होते ते संपले आणि विद्यार्थी आपआपल्या कामात व्यस्त होते. विद्यार्थी आणि युवा हे देशाचे उद्याचे भविष्य आहेत. त्यांचा सन्मान ठेवून पंतप्रधानांनी अनेक कठोर निर्णय घेतले. त्यांनी युवकांशी संवाद देखील साधला, मात्र काँग्रेस व इतर विरोधक गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. काँग्रेसला संसदेत चर्चेसाठी यायचे नाही पण संसदेबाहेर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी निव्वळ राजकारण करायचे आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. 

ते पुढे म्हणाले की, अमित शाहांनी नक्षलवाद संपवला, जम्मू काश्मिरमधील कलम ३७० हटवले, भारतातला पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद संपवला म्हणून काँग्रेस गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतेय का, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला. गृहमंत्री अमित शाहांना दुसऱ्यांनी देशभक्ती शिकवण्याची आवश्यकता नाही. राजकीय स्टंट करण्यापेक्षा विरोधकांनी सभागृहात येऊन सरकारशी चर्चा करावी. सरकार चर्चेसाठी तयार आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना केले. महिला आरक्षणासारख्या महत्वाच्या विधेयकाला सगळ्यांनी पाठिंबा द्यायला हवा. मतदार संघाची पुनर्रचना करणे ही काळाजी गरज आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने न बघता सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

त्यांनी जुनीच कॅसेट पुन्हा वाजवली!

न्यायालयावर त्यांचा विश्वास आहे की नाही हे एकदा त्यांनी ठरवावे

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरु असलेल्या सुनावणीबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर निशाणा साधला. न्यायालयावर त्यांचा विश्वास आहे की नाही हे एकदा त्यांनी ठरवले पाहिजे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. यापूर्वी सुनावणीवेळी ते पेढे वाटत होते. मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे, असे बोलत होते. परंतु महायुतीचे सरकार कायद्याच्या चौकटीत स्थापन केले होते. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीही सरकार घटनाबाह्य नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे जी कॅसेट ते वाजवत होते तीच त्यांनी आज पुन्हा वाजवली, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. त्या सरकारचा आणि आमदारांचाही कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे आमदारांना अपात्र करा, अशी मागणी करणारे कुठल्या काळात वावरतात, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. जनतेच्या न्यायालयात न्याय मागू, असे सांगणाऱ्यांना जनतेने निवडणुकांमध्ये जागा दाखवली. जनतेने आम्हाला स्वीकारले. शिवसेनेचे ४० आमदार होते ते ६० झाले. आम्ही लोकशाही मानणारे आहोत.आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे फार बोलणार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button