
पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या भव्य जागतिक संमेलनाचे उद्घाटन दि. ९ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होईल. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
या जागतिक मराठी संमेलनात दिले जाणारे मानाचे पुरस्कार यंदा गोव्याच्या उद्योगक्षेत्रातील दिग्गज श्री. अनिल खवटे यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार’, तर चित्रपटसृष्टीतील मान्यवर दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते श्री. महेश मांजरेकर यांना ‘मराठी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील. संमेलनाचे कार्याध्यक्ष दशरथ परब व सहकारी अनिल सामंत, रमेश वंसकर संमेलनाच्या आयोजनाची उत्तम तयारी करत आहेत. असे जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रंसंगी अकादमी सदस्य संजय ढेरे, कार्यकारिणी सदस्य महेश म्हात्रे (मुंबई) व संमेलन कार्यवाह गौरव फुटाणे उपस्थित होते.

जागतिक मराठी अकादमीतर्फे दिले जाणारे हे मानाचे सन्मान उद्योग, संस्कृती व कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला दिलेली संस्थात्मक दाद आहे. श्री. अनिल खवटे यांची उद्यमशीलता आणि सामाजिक बांधिलकी, तसेच श्री. महेश मांजरेकर यांच्या कलात्मक संवेदना आणि प्रयोगशील दिग्दर्शनाने मराठी विश्व समृद्ध झाले आहे. ख्यातनाम अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणार्या ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनात जगभरातील कर्तबगार मराठी बांधवांच्या उपस्थितीत या दोन्ही मान्यवरांचा गौरव करण्याचा सन्मान अकादमीला लाभत आहे, याबद्दल रामदास फुटाणे यांनी आनंद व्यक्त केला.

या तीन दिवसांच्या संमेलनात कर्तबगार मराठी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जाणार आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन, त्यांचा जीवनप्रवास समजून घेतला जाईल. याशिवाय, गोव्यातील स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतील.



