देश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रविशेष

‘भाई बँड’ चित्रपटाने इफ्फी (IFFI) 2026 मध्ये सादर केली बंधुभाव, परंपरा आणि बदलत्या काळाची सुरेल कथा

गोवा – गोव्यामध्ये आयोजित 57 व्या ‘इफ्फी’, अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 च्या ‘गाला प्रीमियर’ विभागात आज मनीष सैनी दिग्दर्शित ‘भाई बँड’ हा गुजराती चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट दोन भावांची कथा सांगणारा आहे. दोघेही आपल्या गावातल्या लग्नसमारंभांसाठी पारंपरिक बँड (वाद्यवृंद) चा व्यवसाय करतात. आपापसातल्या मतभेदांमुळे ते एकमेकांपासून दुरावतात आणि त्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण मिळते. काही आठवड्यांनी एक भाऊ डीजे सिस्टीम आणि अवाढव्य स्पीकर घेऊन परततो, त्याच्याकडे असते, केवळ त्याच्या फोनमधील गाण्यांची प्लेलिस्ट. त्यावेळी पारंपरिक बँड पुढे अनपेक्षित आव्हान उभे राहते. पुढे ही कथा तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा पारंपरिक व्यवसायांवर होणारा परिणाम आणि कुटुंबांना एकत्र बांधून ठेवणारे नातेसंबंध, याचा मागोवा घेते.

पीआयबी’ने आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, दिग्दर्शक मनीष सैनी यांनी सांगितले की, हा चित्रपट गुजराती भाषा आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आधारित असला, तरी त्यामधील मूळ संदेश आणि कथानक वैश्विक आहे आणि ते संपूर्ण भारतातील प्रेक्षक त्याच्याशी जोडला जाऊ शकतो. त्यांनी प्रादेशिक सिनेमात रुजलेल्या कलात्मक अभिव्यक्ती आणि कथा लोकप्रिय करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले, त्यामुळे त्या अधिक व्यापक स्तरावरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतील. सैनी म्हणाले की त्यांना चित्रपटाचे शीर्षक विशेष आवडले, कारण ते दोन भावांमधील मैत्री आणि लग्नाचा बँड, या दोन्ही अर्थाने समर्पक आहे.

अभिनेता प्रित कमानी यांनी ने ‘भाई बँड’  हा रंगतदार आणि चैतन्यमय असा वेगळ्याच धाटणीचा चित्रपट असल्याचे सांगितले. आपला पहिलाच गुजराती चित्रपट असल्याबद्दल बोलताना त्यांनी  दिग्दर्शक मनीष सैनी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान मिळालेले सहज वातावरण आणि सर्जनशील स्वातंत्र्य यांचेही त्यांनी कौतुक केले. कलाकार निवडीच्या प्रक्रियेतील एक रंजक किस्साही त्यांनी सांगितला. या भूमिकेसाठी अंतिम निवड होण्यापूर्वी आपण स्वतःहून दिग्दर्शकांना स्क्रीन टेस्ट घेण्याची विनंती केली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली.

अभिनेता चिराग कत्रेचा यांनी आपल्या अभिनयात अस्सलपणा आणण्यासाठी पात्र समजून घेणे आणि ते आत्मसात करणे किती महत्त्वाचे आहे, याविषयी सांगितले. चित्रपटात गायकाची भूमिका साकारताना आलेल्या आव्हानांचाही त्यांनी  उल्लेख केला. हा अनुभव आव्हानात्मक असला, तरी तितकाच रंजक होता, असे त्यांनी नमूद केले.

आपल्या भूमिकेविषयी बोलताना अभिनेत्री श्रद्धा डांगर यानी आपल्या व्यक्तीरेखेचे वर्णन गोड आणि आनंदी स्वभावाची व्यक्ती असे केले. या चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी होण्याचा अनुभव आणि संपूर्ण चमूसोबत काम करताना मिळालेला आनंद याबद्दलही त्यांनी मनापासून सांगितले.

विनोद, संगीत आणि रंजक कथानकाच्या माध्यमातून ‘भाई बँड’ हा चित्रपट विवाह सोहळ्यांच्या बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर एक वेगळी कथा मांडतो. प्रादेशिक कथाकथनातील सांस्कृतिक विविधता आणि समृद्धी अधोरेखित करतानाच, तंत्रज्ञान, पारंपरिक व्यवसाय आणि मानवी नातेसंबंध यांच्यातील परस्परसंबंधांवरही हा चित्रपट भाष्य करतो.

या पत्रकार संवादाचे सूत्रसंचालन श्री. किरण मुरली यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button