इफ्फी 2026 मध्ये ‘भावी सर्जनशील प्रतिभावंत’ म्हणजेच ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो – सीएमओटी’ उपक्रमाच्या सहाव्या वर्षीच्या कार्यक्रमात चित्रपटनिर्मितीमधील उदयोन्मुख प्रतिभांचा गौरव

गोवा – गोवा येथे सुरु असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) चित्रपटाची कथा विकसित करण्यापासून ती रुपेरी पडद्यावर सादर करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर 100 तरुण प्रतिभावंतांची चित्रपट निर्मितीविषयक कौशल्यांची परीक्षा बघणाऱ्या ‘भावी सर्जनशील प्रतिभावंत’ म्हणजेच ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो – सीएमओटी’ उपक्रमाची आज सांगता झाली. देशभरातील या क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभावंतांना एकत्र आणत या उपक्रमामध्ये पाच संघांनी निर्माण केलेल्या चित्रपटांचे सादरीकरण तसेच 15 विविध विभागांमधील उत्कृष्ट प्रतिभांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
या समारोप सोहोळ्यामध्ये 57 व्या इफ्फी चे महोत्सव संचालक आणि चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर; केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात;एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंग तसेच परीक्षक समितीचे सदस्य उपस्थित होते. ग्रेट ग्रँड ज्युरीमध्ये एमी बारुआ, प्रेमराज, मधु अप्सरा, रुमी जाफरी आणि मेधा खर्डेकर रेड्डी यांचा समावेश होता.
सीएमओटी ( क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो) 2026 चे विजेते:
- सर्वोत्कृष्ट चित्रपट: ‘वन लास्ट स्टॉप’ , दिग्दर्शक मोहक गांधी (रेड टीम), 5 लाख रुपयांचे पारितोषिक.
- उपविजेता चित्रपट: ‘अ लिटल समथिंग’, दिग्दर्शिका तमन्ना ठाकूर (ग्रीन टीम), 3 लाख रुपयांचे पारितोषिक.
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: तमन्ना ठाकूर, ‘अ लिटल समथिंग’ (ग्रीन टीम).
- सर्वोत्कृष्ट अभिनय: सिद्धी पारकर, ‘शेल्स’ (ब्लू टीम).
- सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार: त्रियाशा मन्ना, ‘वन लास्ट स्टॉप’ (रेड टीम).
- सर्वोत्कृष्ट संकलक: नयन चोटलिया आणि मानव अग्रवाल, ‘अ लिटल समथिंग’ (ग्रीन टीम).
- सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक: जितिन एस, ‘शेल्स’ (ब्लू टीम).
- सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन (साउंड डिझाइन): अश्विन अशोक, ‘टू सनसेट्स अँड झिरो सनराइझेस’ (यलो टीम).
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन: श्री पार्वती एस, ‘शेल्स’ (ब्लू टीम).
- सर्वोत्कृष्ट संगीतकार: अक्षय अनमोल कटोरे, ‘नील मछली’ (बेझ टीम).
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा (कॉस्च्युम डिझाइन): सृष्टी वाघ आणि रूपालिका पॉल, ‘वन लास्ट स्टॉप’ (रेड टीम).
- सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि रंगभूषा कलाकार: कशिश जयस्वाल, ‘शेल्स’ (Shells) (ब्लू टीम).
- सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन (आर्ट डिझाइन): सृष्टी वाघ आणि रूपालिका पॉल, ‘वन लास्ट स्टॉप’ (रेड टीम).
- सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स (VFX – व्हिज्युअल इफेक्ट्स) कलाकार: हर्ष साहनी आणि प्रकाश कुमार मेहता, ‘नील मछली’ (बेझ टीम).
- सर्वोत्कृष्ट पार्श्वनिवेदन (व्हॉइस-ओव्हर/डबिंग): सुदेक्षा सरकार, ‘अ लिटल समथिंग’ (ग्रीन टीम).
चित्रपटसृष्टीशी जोडणारा एक दुवा
48 तासांचे चित्रपट निर्मितीचे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल स्पर्धकांचे अभिनंदन करताना अतिरिक्त सचिव प्रभात यांनी सीएमओटी हा उपक्रम, उदयोन्मुख प्रतिभा आणि चित्रपटसृष्टी यांना जोडणारा दुवा असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे युवा चित्रपट निर्मात्यांना आपली क्षमता सिद्ध करण्याची आणि चित्रपटसृष्टीतील व्यावसायिकांशी संपर्क साधण्याची संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
‘रूट्स अँड विंग्स: ऑनरिंग अवर रूट्स, एम्ब्रेसिंग अवर फ्यूचर’, या यंदाच्या संकल्पनेचा उल्लेख करत, त्यांनी सांस्कृतिक वारसा, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान यांच्या संगमावर प्रकाश टाकला. त्यांनी AVGC-XR क्षेत्रात वाढत असलेल्या संधींकडेही लक्ष वेधले, ते सर्जनशील उद्योगांमधील तरुण व्यावसायिकांसाठी नवे मार्ग खुले करत आहे, असे ते म्हणाले.
महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर यांनी सर्व टीम्सचे त्यांच्या कामाबद्दल अभिनंदन केले आणि चित्रपट निर्मिती ही मुळातच एक सामूहिक प्रक्रिया असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी उपस्थितांना आठवण करून दिली की चित्रपट हे कधीच एका व्यक्तीचे काम नसून अनेक सर्जनशील शाखांच्या एकत्र येण्याने साधलेला परिणाम असतो. आव्हाना दरम्यान निर्माण झालेले बंध टिकवून ठेवण्यासाठी प्रोत्साहन देत, त्यांनी तरुण चित्रपट निर्मात्यांना एकमेकांशी जोडलेले राहण्याचे, संघ म्हणून काम सुरू ठेवण्याचे आणि अनुभवावर आधारित काम करण्याचे आवाहन केले, CMOT ही केवळ त्यांच्या प्रवासाची सुरुवात असल्याचे ते म्हणाले.
48 तास, पाच संघ, एक सर्जनशील आव्हान
फिल्म मेकिंग चॅलेंज, 21 नोव्हेंबर रोजी सुरू झाले. यात सहभागी असलेल्या 100 जणांची प्रत्येकी 20 जणांच्या पाच संघांमध्ये विभागणी करण्यात आली, त्यांना लाल, हिरवा, निळा, पिवळा आणि बेज या रंगांनी ओळखले गेले. प्रत्येक संघाला ‘रूट्स अँड विंग्स: ऑनरिंग अवर रूट्स, एम्ब्रेसिंग अवर फ्यूचर’, या एकाच संकल्पनेखाली, 48 तासांमध्ये एक लघुपट, कल्पनेपासून ते चित्रीकरणापर्यंत पूर्ण करण्याचे काम देण्यात आले होते.
या स्पर्धेच्या निमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रातील तेरा शाखांमधील सहभागींना एकत्र आणले गेले. यामध्ये दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, संकलन, ध्वनी संयोजन , पट्कथालेखन, कला दिग्दर्शन, अनिमेशन, संगीत, पार्श्वगायन, केशरचना आणि रंगभूषा आणि वेशभूषा रचना यांचा समावेश होता.
गोव्यात अनेक ठिकणी छायाचित्रण केल्यानंतर हे संघ निर्मिती पश्चात कामासाठी कला अकादमीमधील विशेष पोस्ट-प्रॉडक्शन हबमध्ये दाखल झाले, निर्धारित मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी संपादन, ध्वनी मिश्रण आणि दृश्यांची अंतिम सजावट ही सर्व कामे अत्यंत कमी वेळेत आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
यातून आलेल्या निकालामुळे सहभागी संघांची संकल्पनांना सर्जनशीलतेने मांडण्याची हातोटी दिसून आली त्याचबरोबर विविध शाखांमधील सहभागींची एकत्र येऊन अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत देखील काम पूर्ण करण्याची क्षमता दिसून आली.
उदयोन्मुख प्रतिभेची मार्गाची निर्मिती करताना
वर्ष 2021 मध्ये सीएमओटी उपक्रमाची सुरुवात झाल्यापासून हा उपक्रम उदयोन्मुख सर्जनशील व्यावसायिकांना माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाशी जोडणारा मंच म्हणून विकसित झाला आहे. येथील माजी सहभागींनी आंतरराष्ट्रीय उत्पादन संस्थांमध्ये काम करू लागले आहेत आणि त्यांनी कान्स,बर्लिन ,टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तसेच आंतरराष्ट्रीय एमी पारितोषिके यांसारखे प्रतिष्ठित मंच आणि महोत्सवांमध्ये गौरव प्राप्त केला आहे.
मागील आवृत्तीला मिळालेल्या एका उल्लेखनीय यशामध्ये, मुकेश छाबरा कास्टिंग कंपनी (MCCC) द्वारे 18 सहभागींची निवड करण्यात आली, यातूनच उदयोन्मुख प्रतिभेला व्यावसायिक संधींमध्ये रूपांतरित करण्याची या उपक्रमाची क्षमता दिसून येते.
भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (FTII) राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) सहकार्याने या चित्रपटनिर्मिती आव्हानाचे संकल्पन, नियोजन आणि आयोजन केले. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील प्राध्यापकांनी सर्व सहभागींना या संपूर्ण प्रक्रियेत मार्गदर्शन केले. तर एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) ने राज्यभरातील विविध ठिकाणी चित्रीकरणाच्या परवानग्या मिळवून दिल्या.

