काँग्रेस नेते राहुल गांधी करणारडॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण
मुंबई – दिवंगत काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण 5 सप्टेंबर रोजी केडगाव येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित होते.
राज्य सरकारमध्ये महसूल, वन, शिक्षण अशा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद सांभाळलेल्या डॉ. कदम यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला असला, तरी त्यांची कर्मभूमी पुणेच राहिली आहे. 2018 मध्ये त्यांचे निधन झाले. पुरासारखी नैसर्गिक आपत्ती व कोरोना संकटामुळे डॉ. कदम यांचा पुतळा आणि स्मारक उभारण्यास विलंब झाला, असे विश्वजीत कदम यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांच्या हस्ते हा समारंभ सांगली जिल्ह्यातील केडगाव येथे होईल. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित राहणार आहेत. स्मारकाच्या ठिकाणी संग्रहालय तसेच सभागृह उभारण्यात आले आहे. डॉ. पतंगराव कदम यांचा अठरा फूट पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा तयार केल्याची त्यांनी दिली.