इंडोनेशियाचे रामायण पाहण्याची मुंबईकरांना मिळणार संधी
मुंबई
भारत व इंडोनेशिया यांच्यातील राजनैतिक संबंधांना पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त इंडोनेशियाचे नाटयरूपी रामायण व महाभारत यांचा समावेश असलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन केले जाणार असल्याची माहिती इंडोनेशियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एडी वर्दोयो यांनी आज येथे दिली. त्यामुळे इंडोनेशियाचे रामायण महाभारत पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.
एडी वर्दोयो यांनी इंडोनेशियाच्या मुंबईतील वाणिज्यदूतावासाच्या प्रभार स्वीकारल्यानंतर बुधवारी (दि. ८) प्रथमच राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
इंडोनेशियात रामायणाकडे सांस्कृतिक ठेवा म्हणून पाहिले जाते असे सांगून मुस्लिम, ख्रिश्चन व अन्य धर्मीय कलाकार देखील रामायणाच्या सादरीकरणामध्ये भाग घेतात असे वाणिज्यदूतांनी सांगितले. भारतीय संस्कृतीचा इंडोनेशियावर मोठा पगडा असून मुस्लिम धर्मीय लोकांमध्ये देखील राम, विष्णु, सीता आदी नावे ठेवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण या अगोदर नवी दिल्ली येथील दूतावासात ४ वर्षे काम केले असून आपल्या वाणिज्यदूत पदाच्या कार्यकाळात सामाजिक, सांस्कृतिक व व्यापार संबंध वाढविण्यावर आपला भर असेल असे एडी वर्दोयो यांनी सांगितले.
जी – २० शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनात भारताला सहकार्य केल्याबद्दल इंडोनेशियाचे आभार मानताना राज्यपाल बैस यांनी भारत – इंडोनेशिया सांस्कृतिक संबंधांना उजाळा दिला.
इंडोनेशियाने सिंगापूरला मागे टाकत एशियान देशांमधील भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार झाल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. भारतातील अनेक पर्यटक इंडोनेशियात जातात. इंडोनेशिया व भारतात आता थेट विमानसेवा सुरु झाली असून वाणिज्यदूतांनी इंडोनेशियामध्ये भारतीय पर्यटनाला देखील चालना द्यावी अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
बैठकीला इंडोनेशियाचे कॉन्सल – राजशिष्टाचार एंडी गिंटिंग व वरिष्ठ अधिकारी चार्ली जॉन उपस्थित होते.
.