Uncategorized

चंद्रपुरातील स्पर्धा उत्तम आणि दर्जेदार होईल : क्रीडामंत्री संजय बनसोडे

विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात 27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे आणि या निमित्ताने चंद्रपूरकरांना राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा आनंदही घेता येणार आहे. 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प देशगौरव, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केला आहे. त्यामुळे मिशन ऑलिम्पिकच्या निमित्ताने उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट ठेवूनच बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्याचवेळी या स्पर्धा अतिशय दर्जेदार आणि उत्तम होतील, असा विश्वास क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन सभागृह येथे क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित देओल,भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपा महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे,सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषन चवरे,जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी सरासरी 10 वर्षे लागतात, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातूनच मिशन ऑलिम्पिकची सुरुवात झाली पाहिजे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जवळपास 3 हजार खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच, पालक, क्रीडा प्रशिक्षक आदी लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था व्हायला पाहिजे. या दोन्ही व्यवस्था उत्तम असतील तरच पाहुण्यांचे मन जिंकण्यात यश मिळत असते. त्यामुळे उत्तम आयोजन व नियोजनासाठी अधिकाऱ्यांची टीमने सज्ज राहावे आणि कामांचे उत्तम नियोजन करावे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी जेवणाचा दर्जा व भोजनाच्या ठिकाणची स्वच्छता या दोन्हीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button