
मुंबई — कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा दंगा, कल्ला आणि बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. घरातील प्रत्येक दिवस सदस्यांसाठी अधिकाधिक आव्हानात्मक ठरत असतानाच, आता खेळाचा संपूर्ण नूर पालटणारा मोठा ट्विस्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आजच्या भागात बिग बॉसच्या घरात एका खास ‘उल्टा-पुल्टा’ रूमचं दार उघडणार आहे. या रूममध्ये अशी ताकद आहे की ती अख्खा खेळ उलथापालथ करू शकते. याबाबत सदस्यांना इशारा देताना बिग बॉस म्हणाले,

“या आठवड्यात सदस्यांचं ट्रबल होणार डबल. या रूममध्ये अख्खा गेम उल्टा-पुल्टा करून टाकण्याची ताकद आहे.”
या नव्या रूममुळे घरातील समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. कोणाचे कोणाशी असलेले नातेसंबंध बिघडणार, तर कोणाचं नशीब चमकणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. या घडामोडींमुळे घरातील वातावरण चांगलेच तापले असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.
आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, ‘उल्टा-पुल्टा’ रूममुळे नेमकं कोणाला फायदा होणार आणि कोणासाठी हा ट्विस्ट डोकेदुखी ठरणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.



