महायुतीचाच मराठी महापौर; जीपीओत २०० ई-बाईकचा शुभारंभ – अमृता फडणवीस

मुंबई : मुंबईच्या महापौरपदी महायुतीचाच मराठी माणूस बसेल, याबाबत कोणतीही शंका नाही, अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली. मुंबई जीपीओ येथे पोस्टमन व पोस्टवुमनसाठी २०० ई-बाईकच्या वाटपाच्या कार्यक्रमात त्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.

जीपीओ येथे टपाल वितरणासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-बाईक सेवेला फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. याच कार्यक्रमात ‘संदेसे वीरों को’ या पोस्टकार्ड मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमृता फडणवीस यांनी लष्करातील जवानांसाठी पत्र लिहून राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.
महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत फडणवीस म्हणाल्या की, टपाल खात्यात सध्या ५० टक्क्यांहून अधिक महिला कार्यरत असून काही पोस्ट कार्यालये पूर्णतः महिलांच्या नेतृत्वाखाली चालतात. लोकसेवेत महिलांचा पुढाकार उल्लेखनीय असून जीपीओ ही त्याचे उत्तम उदाहरण आहे. ई-बाईकसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे इंडिया पोस्टची कार्यक्षमता वाढेल आणि देशातील सर्वात जुनी व विश्वासार्ह संस्था म्हणून असलेली प्रतिमा अधिक बळकट होईल, असे त्यांनी सांगितले.
इतिहास समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही; त्यामुळे अशा उपक्रमांतून राष्ट्रभक्तीला चालना मिळते, असेही त्यांनी नमूद केले. टपाल कर्मचारी केवळ पत्रे पोहोचवत नाहीत, तर संस्कृतीही जपतात. ई-बाईकमुळे पर्यावरण रक्षण होत असून शाश्वत विकासाची संकल्पना प्रत्यक्षात कशी उतरवता येते, हे जीपीओ दाखवून देत आहे. यामधून ‘नव्या भारता’ची वाटचाल होत असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी ई-बाईक सेवेवर विशेष टपाल आवरण तसेच १९७१ च्या ऐतिहासिक लोंगेवाला लढाईच्या स्मरणार्थ विशेष आवरण प्रकाशित करण्यात आले.

मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह यांनी पार्सल वितरणात मोठी वाढ होत असून ई-बाईक सेवेमुळे अंतिम टप्प्यातील वितरण अधिक वेगवान व सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला मनोज कुमार, सिमरन कौर, रेखा रिझवी, मधु रंगनाथन यांच्यासह टपाल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले.



