महाराष्ट्राचे प्रमुख मुफ्ती मंजूर झियाई यांची पत्रकार परिषद संपन्न

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे संघटक राजू पाटणकर यांनी मुस्लिम समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह, अपमानास्पद व द्वेषपूर्ण वक्तव्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्राचे प्रमुख मुफ्ती मंजूर झियाई यांच्या नेतृत्वाखाली आज मराठी पत्रकार संघ, मुंबई येथील पत्रकार भवन येथे महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद संपन्न झाली.

या पत्रकार परिषदेत बोलताना मुफ्ती मंजूर झियाई यांनी दावा केला कि , राजू पाटणकर यांच्या नावाने सोशल मीडियावर विशेषतः व्हॉट्सअॅप संदेश व वॉइस कॉलद्वारे मुस्लिम समाजाची बदनामी करणारी विधाने प्रसारित झाली असून, “निवडणुकीनंतर मुस्लिम समाजाची कोणतीही कामे केली जाणार नाहीत” अशा धमकीवजा विधानांमुळे समाजात तीव्र अस्वस्थता आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.
राजू पाटणकर यांच्या पत्नी वैशाली राजू पाटणकर या वार्ड क्रमांक 190 मधील उमेदवार असून हा मतदारसंघ मुस्लिमबहुल आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम समाजाविरोधात केलेली ही विधाने लोकशाही मूल्ये, सामाजिक सलोखा आणि संविधानाच्या तत्त्वांना बाधा आणणारी असल्याचे मुफ्ती झियाई यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना मुफ्ती मंजूर झियाई यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, मुस्लिम समाजाची जाहीर बदनामी करणाऱ्या वक्तव्यांसाठी उद्धव ठाकरे यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी केली. तसेच अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण वक्तव्यांवर राजकीय पक्षांनी कठोर भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी उपस्थित मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनीही या प्रकारामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगत, दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.



