
गोव्यात सुरु असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या विभागांतर्गत सादर झालेल्या दोन चित्रपटांशी संबंधित चित्रपटनिर्मात्यांचा सहभाग असलेल्या पत्रकार परिषदेत मातृत्व, करुणाभाव, मानवी असुरक्षितता तसेच जीवनाचे पावित्र्य यांच्याविषयीच्या कथांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले.
रहमा आणि द फार्म्स हे ते दोन चित्रपट असून या चित्रपटांमध्ये एकमेकांपासून भिन्न तरीही एकमेकांशी घट्टपणे जोडल्या गेलेल्या संकल्पनांचा इथे शोध घेण्यात आला असून त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या संघर्षांच्या पलीकडे पाहायला आणि इतरांच्या वेदना तसेच आकांक्षा ओळखून घ्यायला प्रवृत्त केले आहे.
रहमा चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक फैजल सोयसल, द फार्म चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि लेखक एलिफ एडा तसेच द फार्म चित्रपटाचे छायाचित्रण दिग्दर्शक एम्रे पेक्काक या परिषदेमध्ये उपस्थित होते.
यावेळी चित्रपट निर्मात्यांनी सर्जनशील दृष्टी, संकल्पनाविषयक चिंता तसेच या प्रभावी कथा पडद्यावर सादर करण्यामागचे अनुभव यांच्याविषयी महत्त्वपूर्ण विचार सामायिक केले.
रहमा: मातृत्व, ओढ आणि मानवी संबंधांचा हृदयस्पर्शी शोध
फैजल सोयसल यांनी दिग्दर्शित केलेली तसेच लिहिलेली रहमा या चित्रपटाची कथा मरियम या पुरातत्वशास्त्रज्ञ स्त्रीची कथा सांगते. अनेक शस्त्रक्रिया तसेच आयव्हीएफ पद्धतीचे उपचार घेऊनही मरियमची आई होण्याची इच्छा पूर्ण होत नाही. जसजशी तिची ही आशा मावळू लागते तशी ती पती इब्राहीम याच्या आक्षेपानंतरही जॉर्जियामध्ये सरोगसी म्हणजे दुसऱ्या स्त्रीच्या गर्भात स्वतःचे मूल रुजवून, वाढवून, जन्माला घालण्याच्या पद्धतीचा विचार करू लागते. स्वतःच्या बळावर जगण्यासाठी धडपड करणाऱ्या रहमा या सिरियातील नऊ वर्षीय मुलीची भेट झाल्यानंतर मरियमचे आयुष्य एक अनपेक्षित वळण घेते. रहमाची परिस्थिती हळूहळू लक्षात आल्यानंतर, त्या दोघींच्या दरम्यान एक असामान्य बंध निर्माण व्हायला सुरुवात होते आणि त्यातून मरियमच्या आयुष्यामध्ये समाधान येऊन तिची भावनिकदृष्ट्या सावरण्याची वाटचाल सुरु होते.
या चित्रपटाच्या प्रेरणास्थानाबद्दल बोलताना फैजल सोयसल म्हणाले की, स्वतःचे मूल जन्माला घालण्यासाठी टोकाच्या संघर्षाला तोंड देणारी अनेक जोडपी आणि त्याचवेळी कुटुंबांच्या छायेविना मोठी होणारी अनेक मुले यांचा एकत्रित विचार करण्याच्या प्रक्रियेतून या कथेचा जन्म झाला आहे. रहमा चित्रपटाच्या माध्यमातून, त्यांनी पालकत्वाची भावनिक गुंतागुंत, कुटुंबाचा अर्थ आणि मानवी नातेसंबंध ज्या मार्गांनी खोलवर रुजलेल्या भावनिक गरजा पूर्ण करू शकतात असे अनपेक्षित मार्ग यांचा शोध
घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे.

‘द फार्म’ : जीवनाच्या हक्कासाठी एका चिमुरडीचा धाडसी संघर्ष
एलिफ एडा लिखित आणि दिग्दर्शित ‘द फार्म’ हा चित्रपट 12 वर्षांच्या इरेमची कथा मांडतो. आई-वडिलांच्या अचानक निधनानंतर ती आपल्या दुरावलेल्या आजीसोबत एका दुग्धशाळेत राहायला जाते. दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी नवजात वासरांना त्यांच्या आईपासून वेगळे करण्याची प्रथा पाहून इरेम अस्वस्थ होते. मुक्या प्राण्यांना दिली जाणारी ही क्रूर वागणूक तिला सहन होत नाही. दुग्धशाळेतील पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे शिकाऊ म्हणून काम करणाऱ्या हलिद या अनाथ मुलाची मदत घेऊन ती गाभण गायींची सुटका करण्याचा निर्धार करते आणि त्यासाठी मोहीम हाती घेते.
चित्रपटाच्या मध्यवर्ती संकल्पनेबद्दल बोलताना एलिफ एडा यांनी सर्व प्रकारच्या जीवसृष्टीचा आदर करण्याचे आणि इतरांच्या दुःखाबद्दल संवेदनशील राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मते, खरा धोका केवळ वेदना सहन करण्यात नाही, तर इतरांना होणाऱ्या वेदनांबद्दल आपण संवेदनाहीन होण्यात आहे. पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे जीवन अमूल्य असल्याचे सांगत ते नमूद करतात की, प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची मानवाची इच्छा अनेकदा इतर सजीवांच्या दुःखाला कारणीभूत ठरते.
चित्रपटाच्या माध्यमातून प्राण्यांच्या अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या वेदनांना वाचा फोडण्याचा आपला प्रयत्न असल्याचे चित्रपट दिग्दर्शक एलिफ एडा यांनी स्पष्ट केले. चित्रपटसृष्टीत महिला दिग्दर्शक म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करताना आलेल्या आव्हानांबद्दलही त्यांनी सांगितले. तसेच, महिलांना स्वतःतील कलागुणांना वाव देण्याची इच्छा पूर्ण करताना अनेक अतिरिक्त अडचणींचा सामना करावा लागतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘द फार्म’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव सांगताना छायाचित्रण दिग्दर्शक एमरे पेकचाकीर यांनी गायींचे चित्रीकरण करताना उभ्या ठाकलेल्या वेगळ्या आव्हानांची माहिती दिली. चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान त्यांनी बराच वेळ शेता (फार्म) वर घालवला. प्राण्यांच्या हालचाली, त्यांचा स्वभाव आणि आजूबाजूच्या वातावरणाचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी ते प्राण्यांच्या सान्निध्यात राहिले. काही आव्हाने जाणवली असली, तरी प्राण्यांसोबत चित्रीकरण करण्याचा अनुभव आनंददायक आणि समृद्ध करणारा होता, असे त्यांनी सांगितले.
‘रहमान’ (Rahman) आणि ‘द फार्म’ (The Farm) हे दोन्ही चित्रपट करुणा, आपुलकी आणि सहानुभूती यांचे महत्त्व अधोरेखित करतात. हे चित्रपट प्रेक्षकांना स्वतःच्या अनुभवविश्वापलीकडे जाऊन इतरांच्या भावना, परिस्थिती आणि संघर्ष समजून घेण्याची प्रेरणा देतात.
या सत्राचे सूत्रसंचालन शिल्पा निळकंठ यांनी केले.



