
पणजी : भाषा वेगळी, संस्कृती वेगळी आणि देशांच्या सीमाही वेगळ्या; मात्र चित्रपटांची भाषा जगभरातील प्रेक्षकांना एकत्र आणते. याच विचारातून गोव्यात 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (IFFI 2026) दिमाखात सुरुवात झाली. यंदा ‘सीमाविरहित कथा’ ही संकल्पना घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात तब्बल 86 देशांतील 150 हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 20 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा चित्रपट सोहळा जगभरातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि चित्रपटप्रेमींना एकाच व्यासपीठावर आणणार आहे.

गोव्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, अभिनेते आणि खासदार रवी किशन, चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या उपस्थितीनेही सोहळ्याला विशेष रंगत आली.
भाषा वेगळी असली तरी भावना एकच!
चित्रपटांना कोणत्याही देशाची किंवा भाषेची सीमा अडवू शकत नाही. एका देशात तयार झालेली कथा दुसऱ्या देशातील प्रेक्षकांनाही भावनिकदृष्ट्या जोडू शकते. यंदाच्या महोत्सवाची ‘सीमाविरहित कथा’ ही संकल्पना याच विचारावर आधारित आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इफ्फी हा गेल्या २२ वर्षांहून अधिक काळ राज्याच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनल्याचे सांगितले.
भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचाराशी या संकल्पनेचे नाते असल्याचे त्यांनी नमूद केले. चित्रपटांमुळे वेगवेगळ्या संस्कृती, माणसांचे अनुभव आणि विचार समजून घेण्याची संधी मिळते. रामायण चित्रपटाचा ब्रिक्स चित्रपट विभागात समावेश होणे ही अभिमानाची बाब असल्याचेही सावंत म्हणाले. मराठी, कोकणी आणि गोव्यातील चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यात इफ्फीची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यात चित्रपट निर्मितीपासून पोस्ट प्रॉडक्शनपर्यंत सुविधा उभारणार
गोव्याला केवळ चित्रपटांच्या चित्रीकरणाचे ठिकाण न ठेवता, चित्रपट तयार होण्यापासून ते पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचे केंद्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. त्यासाठी गोवा चित्रपट चित्रीकरण कायदा २०२१, ऑनलाइन सिंगल विंडो परवानगी व्यवस्था आणि निर्मात्यांसाठी आर्थिक मदतीच्या योजनांचा आधार घेतला जात आहे.
चित्रपट निर्मिती, एडिटिंग, व्हीएफएक्स, अॅनिमेशन आणि चित्रपट प्रशिक्षण अशा विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी फिल्मसिटी उभारण्याचाही सरकारचा विचार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि व्हर्च्युअल प्रॉडक्शनसारख्या नव्या तंत्रज्ञानात गोव्यातील तरुणांना संधी मिळावी, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
‘चित्रपटांच्या कथा पासपोर्टशिवाय सीमा ओलांडतात’
इफ्फीचे महोत्सव संचालक आणि चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी चित्रपटांच्या ताकदीचे वेगळ्या शब्दांत वर्णन केले. आज जगभरात संपर्काची साधने वाढली असली तरी माणसांमधील अंतर कायम आहे. मात्र, चित्रपट हे अंतर कमी करू शकतात. अनोळखी भाषा बोलणाऱ्या चित्रपटातील पात्रांशीही प्रेक्षक सहज जोडले जातात. चित्रपटांच्या कथा पासपोर्टशिवाय एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचतात, असे ते म्हणाले.
यंदाच्या महोत्सवात नऊ जागतिक प्रीमियर, दोन आंतरराष्ट्रीय प्रीमियर, २४ आशियाई प्रीमियर आणि ११६ भारतीय चित्रपटांचे प्रीमियर सादर होणार आहेत. त्यामुळे नव्या चित्रपटांसोबतच वेगवेगळ्या देशांतील कथांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

रवी किशन यांचे ७०० चित्रपटांचे उदाहरण
अभिनेते आणि खासदार रवी किशन यांनी ‘सीमाविरहित कथा’ या संकल्पनेशी आपला चित्रपट प्रवास जोडला. आपण आतापर्यंत विविध भारतीय भाषा आणि प्रादेशिक चित्रपटांमध्ये सुमारे ७०० चित्रपटांत काम केल्याचे त्यांनी सांगितले. भाषा किंवा प्रदेश कोणताही असला तरी चांगली कथा, भावना आणि अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. एका कोपऱ्यात तयार झालेली कथा हजारो किलोमीटर दूर असलेल्या प्रेक्षकांनाही आपलीशी वाटू शकते, हीच चित्रपटांची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणाऱ्या देशांपैकी एक असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले.

52 महिला दिग्दर्शक, 62 नवोदितांना संधी
यंदाच्या इफ्फीमध्ये नव्या पिढीतील चित्रपट निर्मात्यांनाही विशेष स्थान देण्यात आले आहे. महोत्सवात ५२ महिला चित्रपट निर्मात्यांचा, तर पहिल्यांदाच चित्रपट सादर करणाऱ्या ६२ दिग्दर्शकांचा सहभाग आहे. रशिया आणि स्पेनच्या चित्रपटांचे विशेष प्रदर्शन तसेच ब्रिक्स देशांतील २१ चित्रपटही यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहेत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी चित्रपटांना भारताच्या सांस्कृतिक ताकदीचे प्रभावी माध्यम म्हटले. वेगवेगळ्या देशांतील विचार, संस्कृती आणि मानवी अनुभव एकत्र आणण्याचे काम चित्रपट करतात, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, इफ्फीच्या निमित्ताने २० वा वेव्हज फिल्म बझारही २० नोव्हेंबरपासून गोव्यात सुरू झाला आहे. चित्रपट निर्माते, गुंतवणूकदार आणि चित्रपट व्यवसायाशी संबंधित लोकांना एकत्र आणणे, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.

उद्घाटन सोहळ्याला खासदार सदानंद शेट तानावडे, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी, चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार, गोव्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, आमदार डेलिला लोबो यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चित्रपट हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून जगभरातील माणसांना जोडणारा दुवा आहे. यंदाच्या इफ्फीमध्ये ८६ देशांतील चित्रपटांच्या माध्यमातून हाच अनुभव गोव्यातील प्रेक्षकांना घेता येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस गोवा केवळ पर्यटनाचे नव्हे, तर जागतिक चित्रपटविश्वाचेही आकर्षण ठरणार आहे.



