भारत भाग्य विधाता’ प्रदर्शित; कंगनाच्या अभिनयाने जिंकली मनं,करकरे-कामटे विस्मरणात?

मुंबई – अभिनेत्री कंगना रणौत यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘भारत भाग्य विधाता’ने गुरुवारी (१२ जून) चित्रपटगृहांत प्रदर्शित होताचा चर्चेला उधाण आले आहे. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यांदरम्यान कामा रुग्णालयातील परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शौर्यावर आधारित या चित्रपटात कंगनाने एका धाडसी नर्सची भूमिका साकारली आहे.
चित्रपट प्रदर्शनानंतर प्रेक्षकांकडून प्रामुख्याने सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी चित्रपटातील भावनिक गहनता, देशभक्तीची भावना आणि संकटकाळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धैर्याचे प्रभावी चित्रण याचे विशेष कौतुक केले आहे.
एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लिहिले, “‘भारत भाग्य विधाता’ ही केवळ २६/११ हल्ल्यांदरम्यान जीव वाचवणाऱ्या परिचारिकांची कथा नाही, तर कठीण प्रसंगात त्यांनी घेतलेल्या सूज्ञ निर्णयांची आणि ‘कर्तव्य प्रथम’ या भावनेची कहाणी आहे. प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याला हा चित्रपट स्वतःची गोष्ट वाटेल.”
‘बाबूमोशाय’ या एक्स (ट्विटर) वापरकर्त्याने नागरिकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन करताना म्हटले, “हा चित्रपट कामा रुग्णालयातील त्या अनामिक परिचारिकांना मानवंदना आहे, ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेकडो लोकांचे प्राण वाचविले. त्यांचे धैर्य, करुणा आणि निस्वार्थ सेवा मोठ्या पडद्यावर अनुभवणे आवश्यक आहे.”
चित्रपटातील वास्तववादी वातावरणनिर्मिती आणि कंगना रणौत यांच्या संयत अभिनयाची विशेष चर्चा होत आहे. मात्र, काही प्रेक्षकांनी पटकथा आणि दिग्दर्शनाबाबत मिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
जेष्ठ चित्रपट समीक्षक हर्षदा वेदपाठक म्हणाल्या की
“‘भारत भाग्य विधाता’ हा केवळ दहशतवादी हल्ल्यांवर आधारित चित्रपट नाही, तर संकटकाळात कर्तव्याला सर्वोच्च स्थान देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अदम्य जिद्दीचा कहाणी आहे. काही ठिकाणी पटकथा अधिक प्रभावी होऊ शकली असती,तरी कंगना रणौत यांचा संयत अभिनय आणि भावनिक प्रसंग चित्रपटाला वेगळी उंची देतात.२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात कामा रुग्णालयातील परिचारिकांच्या शौर्याची कहाणी मांडताना शहीद पोलीस आणि एटीएस अधिकाऱ्यांचा उल्लेख विशेषतः हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर आणि तुकाराम ओंबळे यांसारख्या शूर अधिकाऱ्यांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना हर्षदा वेदपाठक यांनी व्यक्त केली आहे.
चित्रपटगृहांत प्रेक्षकांची गर्दी आणि सोशल मीडियावरील चर्चा पाहता ‘भारत भाग्य विधाता’ यंदाच्या वर्षातील चर्चित चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.



