म्हाडा- मुंबई मंडळ सदनिका सोडत -२०२६सोडतीतील कन्नमवार नगर-विक्रोळी (पूर्व) प्रकल्पामधील १२२१ पैकी ६१० सदनिका आता केवळ उच्च उत्पन्न गटासाठी
मुंबई : म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील कन्नमवार नगर-विक्रोळी (पूर्व) प्रकल्पातील १२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका आता केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाधिक नागरिकांना सोडत प्रक्रियेमध्ये सहभाग घेता यावा याकरिता मंडळातर्फे ऑनलाईन नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला दि. २८ मे, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे.
मुंबई मंडळातर्फे २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीतील कन्नमवार नगर-विक्रोळी (पूर्व) प्रकल्पातील संकेत क्रमांक ५३८ व ५३९ मधील १२२१ सदनिकांच्या विक्री किंमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आली. मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या १२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका सोडतीत संकेत क्रमांक ५३८-अ व संकेत क्रमांक ५३९-अ या नवीन संकेत क्रमांकान्वये केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संगणकीय सोडत प्रणालीमध्ये सदर बदल उद्यापासून म्हणजे दिनांक १४ मे, २०२६ रोजी दुपारी १२ पासून अद्ययावत करण्यात येणार आहे .
संकेत क्रमांक ५३८ व संकेत क्रमांक ५३९ मधील सदनिकांच्या विक्री किंमतीत ७.५ टक्के कपातीचा यापूर्वी घेतलेला निर्णय संकेत क्रमांक ५३८-अ व संकेत क्रमांक ५३९-अ मधील उच्च उत्पन्न गटातील सदनिकांसाठीही लागू असणार आहे. तसेच या प्रकल्पातील सदनिका धारकांना प्रत्येकी ०१ वाहनतळ (पार्कीग) विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. करिता या संधीचा अधिकाधिक इच्छुक अर्जदारांना लाभ घेण्यात यावा याकरिता मंडळातर्फे मुदतवाढ देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार दि. २८ मे, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील व दि. २९ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करू शकतील. तसेच दि. २९ मे, २०२६ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. त्यानंतर सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी दि. १० जून, २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. १२ जून, २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. दि. १६ जून, २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. मंडळातर्फे सदनिकांच्या विक्रीसाठी प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत दिनांक, ठिकाण व वेळ नंतर संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.
मुंबई मंडळाने दि. ३० मार्च, २०२६ रोजी मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील २६४० सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत जाहीर केली. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) १४५ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) ८५८ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) ७९८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) ८३९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
मुंबई मंडळाने सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १२२१ सदनिकांच्या किंमतीत ७.५ टक्के कपात केली आहे. मंडळातर्फे मार्च, २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या सोडतीमध्ये संकेत क्रमांक ५३८ व ५३८-अ, अंतर्गत बिल्डींग नं. २ अ, ब पॉकेट- २, कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई येथील अनुक्रमे २४० व २४० सदनिकांची विक्री किंमत रु. १,३४,६६,४३४ /- ते रु.१,३६,८८,१४३/- , संकेत क्रमांक – ५३९ व ५३९-अ अंतर्गत बिल्डींग नं. ३ अ, ब, क पॉकेट क्र. २ कन्नमवार नगर, विक्रोळी, येथील anukrame ३७१ व ३७० सदनिकांची विक्री किंमत रु. १,३४,८१,८२१ /- ते रु. १,३७,०३,७८३/- अशी ७.५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे.
म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ https://housing.mhada.gov.in व IHLMS 2.0 Integrated Mhada Housing Lottery System मोबाइल ॲप या संगणकीय प्रणालीद्वारेच म्हाडाच्या सोडतीमध्ये अर्ज करावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर अनुक्रमे गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये IHLMS 2.0 Integrated Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल ॲप उपलब्ध आहे.
मंडळातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, सोडत प्रक्रियेबाबत कोणी व्यक्ति/ दलाल काही प्रलोभने देऊन फसवणूक करीत असल्याचे आढळल्यास त्यांनी म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी तसेच उपमुख्य अधिकारी (पणन) मुंबई मंडळ यांच्या कार्यालयास कळवावे. अर्जदारांनी सोडतीविषयक सविस्तर माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करणे आवश्यक आहे. अर्ज करतेवेळी अर्जदारांना येणाऱ्या अडचणींसाठी मार्गदर्शनासाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई मंडळाने केले आहे.



