पणजी, विशेष प्रतिनिधी : जगभरातील सिनेमांची सफर घडवणारा, विविध भाषांतील कलाकृतींचा संगम साधणारा आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांना एकाच व्यासपीठावर आणणारा ५७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) आज शनिवारी सांगता होत आहे. गेल्या नऊ दिवसांपासून गोवा चित्रपटांच्या रंगात रंगला होता. देश-विदेशातील चित्रपट, कलाकारांच्या भेटीगाठी, दिग्दर्शकांशी संवाद आणि सिनेमाविषयक चर्चांनी पणजीत उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते.
पणजीतील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आज सायंकाळी सांगता समारंभ पार पडणार आहे. या सोहळ्यात महोत्सवातील पुरस्कारांचे वितरण आणि विजेत्या चित्रपटांचा गौरव केला जाणार आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील मान्यवरांसह सिनेरसिकांचे लक्ष या समारंभाकडे लागले आहे.
यंदाच्या महोत्सवात भारतीय चित्रपटांसोबतच जगभरातील विविध देशांच्या चित्रपटांना स्थान मिळाले. वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, सामाजिक प्रश्न आणि मानवी भावभावनांचे दर्शन घडवणाऱ्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेगळी अनुभूती दिली. केवळ मनोरंजन नव्हे, तर चित्रपटांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण आणि नव्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्याचे कामही या महोत्सवाने केले.
नऊ दिवसांच्या आठवणी घेऊन पडदा पडणार!
चित्रपट पाहण्याबरोबरच कलाकारांशी संवाद साधण्याची, दिग्दर्शकांचे अनुभव ऐकण्याची आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील नवे प्रवाह समजून घेण्याची संधी या महोत्सवामुळे मिळाली. आता नऊ दिवसांच्या या सिनेमहोत्सवावर पडदा पडणार असला, तरी गोव्यात अनुभवलेल्या सिनेमाच्या या अविस्मरणीय पर्वाच्या आठवणी सिनेरसिकांच्या मनात कायम राहणार आहेत.



