देश-विदेशमनोरंजनविशेषशहर

झपाटलेला ३ : धडकी भरवणारा थरार तिसऱ्या भागातही पाहायला मिळणार

मुंबई

रसिक प्रेक्षकहो, गेल्या काही वर्षांपासून तुम्ही ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहताय, ती घोषणा आम्ही आज करीत आहोत. तुमच्या आमच्या मनात घर केलेल्या ‘झपाटलेला’ फ्रॅंचायझीचा तिसरा भाग म्हणजेच ‘झपाटलेला ३’ची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हॉरर-कॉमेडी जॉनर असलेल्या या चित्रपटाचं गारुड गेल्या तीन दशकांपासून प्रेक्षकांवर कायम असून याच्या निर्मितीचा प्रारंभ आता होत आहे.

‘झपाटलेला’, ‘झपाटलेला २’ या दोन कलाकृती दिग्दर्शित करणारे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनीच ‘झपाटलेला ३’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. रजनीश खनुजा (सिलेक्ट मीडिया होल्डिंग्ज) आणि महेश कोठारे (जेनमा फिल्म्स इंटरनॅशनल) यांच्या संयुक्त विद्यमानातून या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

‘झपाटलेला ३’चं प्रमुख आकर्षक असणार आहे तो प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे. यावेळीही आदिनाथ आपल्या अदकारीनं प्रेक्षकांना मनोरंजनाच्या एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे. तसेच रसिक प्रेक्षकांनी ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं किंवा ज्याचा प्रचंड धसका घेतलाय असा तात्या विंचूदेखील या चित्रपटात आणखी नव्या एनर्जीनं पाहायला मिळणार आहे. अर्थात, या दोघांच्या जोडीला आणखी एक जबरदस्त नवीन पात्र या चित्रपटात समाविष्ट होणार आहे. हे पात्र ‘झपाटलेला ३’चा प्रवास आणखी वेगवान आणि मनोरंजक करणार आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश कोठारे म्हणतात, ‘’ झपाटलेला चित्रपटाच्या फ्रॅंचायझीमधील दोन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर त्याच ताकदीचा किमबहुना त्याहून अधिक ताकदीचा पुढील चित्रपट देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. ‘झपाटलेला ३’च्या कथानकाची भट्टी एकदम जमून आली असून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक धमाल प्रवास ठरणार आहे.’’

‘झपाटलेला ३’चे निर्माते रजनीश खनुजा म्हणाले, ‘’ ‘झपाटलेला’नं निर्माण केलेलं विश्व आणि या चित्रपटाच्या हुशार आणि तगड्या टीमबरोबर जोडले जाण्याचा मला मनस्वी खूप आनंद होत आहे. ‘झपाटलेला ३’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी आहे. जगभरातील प्रेक्षकांसमोर ही कलाकृती लवकरात लवकर आणण्यासाठी आम्ही आतुर झालो आहोत.’’

‘झपाटलेला ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला या वर्षाच्या अखेरीस प्रारंभ होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button