
गोवा ( पणजी ) हर्षदा वेदपाठक – अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या गोवा राज्यात दि. 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत 55 वा IFFI म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे. यावर्षीच्या महोत्सवाच्या निमित्ताने वैविध्यपूर्ण कथने आणि अभिनव भूमिका समोर येणार असून सांस्कृतिक आदानप्रदानाच्या माध्यमातून चित्रपटरसिकांना एक पर्वणीच मिळणार आहे.

इफ्फीसाठी गोव्यात आयोजित कर्टन रेझर पत्रकार परिषदेला संबोधित करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी, 55 व्या इफ्फीसाठी गोवा संपूर्ण सिद्ध असून या भव्य चित्रपट महोत्सवासाठी अतिथींचे स्वागत करण्यास गोवा उत्सुक आहे, असे सांगितले. या महोत्सवात 81 देशांतील 180 चित्रपट प्रदर्शित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महोत्सवाच्या निरनिराळ्या ठिकाणांदरम्यान अतिथींना सहज प्रवास करता येण्यासाठी विनामूल्य वाहतूक सुविधा पुरवण्यात येणार आहे. महोत्सवात गोव्याच्या चित्रपटांसाठी विशेष विभाग असून यात स्थानिक प्रतिभा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे 14 चित्रपट दाखवले जाणार आहेत. इफ्फी संचलनाच्या मार्गावर ‘स्काय लँटर्न’ (आकाशकंदील) स्पर्धा घेतली जाईल आणि सहभागी स्पर्धकांना रोख बक्षिसे दिली जातील, असेही ते म्हणाले. 22 नोव्हेंबरला ईएसजी ऑफिसपासून ते कला अकादमीपर्यंत इफ्फी संचलनाचे आयोजन होणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.हा महोत्सव पर्यावरणस्नेही पद्धतीने पार पडावा आणि सर्व लोकांना त्यात सहभागी होणे सुलभ असावे या उद्देशाने सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा च्या उपाध्यक्ष डेलियाह लोबो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली

यावर्षी 6500 अतिथींची नोंदणी झाली असून गेल्यावर्षीपेक्षा हा आकडा 25 टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव तथा NFDC चे (राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ) व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार यांनी दिली. चित्रपटप्रेमींना महोत्सवाट प्रवेश करून त्याचा आनंद घेणे अधिक सोपे जावे यासाठी आणखी 6 पडदे आणि 45 टक्के अधिक स्क्रिनिंग थिएटर्स यावर्षी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. चित्रपट उद्योगातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्वे महोत्सवाची शोभा वाढवतील असेही कुमार यांनी सांगितले. लोकांचा सहभाग आणि एकंदर अनुभूती या बाबतीत हा महोत्सव नव्या यशोशिखरावर पोहोचावा यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली NFDC सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल. मुरुगन सातत्याने या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेत आहेत. या क्षेत्रातील सर्व भागधारकांना एकत्र आणण्याचा या महोत्सवाचा प्रयत्न असून त्यासाठी मंत्रालयाच्या सचिवांच्या कुशल मार्गदर्शनाखाली समन्वयाने व कालबद्ध रीतीने काम केले जात आहे, असे कुमार यांनी सांगितले.
पत्रकारांना चित्रपट व्यवसायाशी संबंधित सर्व विभागांची आणि चित्रपट उद्योगाच्या विविध पैलूंची सखोल माहिती देण्यासाठी एक विशेष यात्रा (प्रेस टूर) आयोजित केली जाईल, अशी माहितीही कुमार यांनी दिली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव वृंदा देसाई, आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) महासंचालक स्मिता वत्स शर्मा आणि पीआयबी तसेच ईएसजी चे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
- ‘इफ्फीएस्टा’: संवादात्मक अनुभव आणि सांस्कृतिक उत्सव :इफ्फी यावर्षी पहिला इफ्फीएस्टा आयोजित करेल जो चित्रपट, संगीत, नृत्य, खाद्यपदार्थ, कला आणि परस्परसंवादी अनुभवांच्या जादूच्या माध्यमातून समुदायाला एकत्र आणणारा एक करमणुकीचा अनोखा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांसाठी झोमॅटोद्वारा पुरस्कृत भोजन आणि संगीताचा हा उत्तम मेळ असेल. कला अकादमी आणि त्याच्या आसपासचे मनोरंजन क्षेत्र प्रामुख्याने युवकांसाठी असेल. यात भारतीय चित्रपटांच्या प्रवासावरील प्रदर्शनासह शताब्दी वर्षांचे भव्य प्रदर्शन असेल. 22 नोव्हेंबर रोजी IFFiesta चा भाग म्हणून ‘जर्नी ऑफ इंडियन सिनेमा’वर केंद्रित कार्निव्हल परेडचे आयोजन केले जाईल.
- प्रवेशसुगमता आणि सर्वसमावेशकता: इफ्फीच्या इतिहासात प्रथमच , 55 वा इफ्फी सहजसुलभ प्रवेशयोग्य इफ्फी महोत्सव असेल. हा चित्रपट महोत्सव सर्व चित्रपट रसिकांसाठी, विशेषत: दिव्यांग लोकांसह, सर्व रसिकांसाठी प्रवेशसुगम आहे याची खात्री करण्यासाठी, इफ्फीने ‘स्वयम्’ या अग्रगण्य संस्थेला प्रवेशसुगमता भागीदार म्हणून नेमले आहे. इफ्फी 2024 सर्वसमावेशकतेसाठी वचनबद्ध असून त्यात, सर्व ठिकाणे सुलभपणे प्रवेश करण्यासाठी सुयोग्य बनवली आहेत, तसेच स्वयंसेवकांना दिव्यांगांबद्दल संवेदनशील करण्यात आले आहे. माननीय पंतप्रधानांनी दिलेल्या “सबका साथ, सबका विकास” च्या भावनेला मूर्त स्वरुप देत इफ्फीमधील सर्व चित्रपट, कार्यक्रम आणि उपक्रमांचे वर्णन श्राव्य पध्दतीने ऐकण्यासाठी आणि सांकेतिक भाषेतील स्पष्टिकरणांसह तसेच, ऍप्लिकेशन्सच्या वापराद्वारे यातील सुगमता सुनिश्चित करण्यात आली आहे


