
हर्षदा वेदपाठक
दिल्ली – प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात त्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हातात घेतले आहे.
आज तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. पत्रकार परिषदेतील देशातील लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. कोणत्या राज्यात किती तारखेला आणि कोणत्या टप्प्यात निवडणुका पार होतील याची देखील घोषणा या पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच अनुराधा पौडवाल यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्या लोकसभा निवडणूक लढणार का याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.

६९ वर्षीय अनुराधा पौडवाल यांनी ९० च्या दशकामध्ये अनेक सुमधुर प्रसिद्ध गाणी गायली आहेत. आजही त्या गाण्यांचे रिमेक सगळ्यांना ताल धरायला लावतात. चित्रपटातील पार्श्वगायन या नंतर, अनुराधा पौडवाल यांचे नाव भक्तिसंगीतामध्ये प्रामुख्याने घेतले जाते. अनुराधा पौडवाल यांनी विविध भाषांमध्ये गीते गायली आहेत.
कौटुंबिक पार्श्वभूमी :
१९६९ मध्ये अरुण पौडवाल यांच्यासोबत अलका नाडकर्णी म्हणजे आताच्या अनुराधा पौडवाल यांचे लग्न झाले. ते एस.डी. बर्मन यांचे असिस्टंट आणि म्यूझिक कंम्पोझर होते. या दांपत्याला आदित्य नावाचा मुलगा आणि कविता नावाची मुलगी आहे. त्यांच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. तर १९९१ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले.
पक्ष सांगेल त्याप्रमाणे आपण करणार : अनुराधा पौडवाल
लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या, “अद्याप मला त्या बद्दल काहीहि माहिती नसून पक्ष जसं सांगेल, तसं आपण काम करणार आहोत. भाजप पक्षा मध्ये येणे हे, मी माझं भाग्य समजते”.




