
मुंबई – वॉर २ मध्ये हृतिक-एनटीआरचा ॲक्शनचा तडका असून हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे.
अयान मुखर्जीचा ॲक्शनपॅक वॉर 2 हा चित्रपट, ६ देशांमध्ये चित्रित केलेला आहे. हाय ऍक्शन स्टंट आणि समाजाला सकारात्मक संदेश या चित्रपटात आहे.
ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वॉर २’ ने स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठ्या पडद्यावर धमाकेदार एंट्री केली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एनटीआरने म्हटले होते, “‘वॉर २’ एक वेडेपणा असणार आहे… तुम्ही हे वेड पाहणार!” आणि खरंच, चित्रपटाच्या पहिल्याच फ्रेमपासून प्रेक्षकांना ॲक्शन आणि ॲडव्हेंचरचा असा अनुभव मिळतो की ते जागेवरून उठत नाहीत.

चित्रपटाच्या कथेत सस्पेन्स आणि थरार पुरेपूर भरलेला आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी ६ वेगवेगळ्या देशांमधील लोकेशन्स मोठ्या शानदार पद्धतीने पडद्यावर आणल्या आहेत. हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरची टक्कर, हाय-ऑक्टेन स्टंट्स आणि त्यांची दमदार स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांना रोमांचित करते.
एनटीआरने आपल्या भूमिकेसाठी फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे, तर हृतिकचा स्टाइल आणि ॲक्शन सीक्वेन्स त्याची स्टार पॉवर आणखी वाढवतात. मात्र, चित्रपटाची लांबी आणि विखुरलेले फ्लॅशबॅक सीन्स यामुळे त्याची गती थोडी मंदावते. कथेच्या काही भागांमध्ये एडिटिंगचा आणि सुटसुटीतपणाचा अभाव जाणवतो, पण खलनायकाची ओळख बराच काळ लपवून ठेवल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता टिकून राहते.
’वॉर २’ हा फक्त एक ॲक्शन चित्रपट नाही, तर चुकीच्या मार्गावर गेलेल्या लोकांची कथा आहे, जो शेवटी योग्य मार्ग निवडण्याचा संदेश देतो. १५ ऑगस्टला प्रदर्शित झाल्यामुळे चित्रपटाचा देशभक्तीशी संबंधित संदेश आणखी प्रभावी होतो.
ॲक्शनप्रेमींसाठी हा चित्रपट एक खास भेटच आहे. उत्तम सिनेमॅटोग्राफी, आंतरराष्ट्रीय लोकेशन्स आणि जबरदस्त स्टंट्स यामुळे हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये पाहण्यासारखा आहे. तरी लक्षात ठेवा, वॉर 1 च्या तुलनेत हा चित्रपट अशक्त आहे खरा. मात्र चित्रपटाला खरा फायदा होईल तो, अनोखी स्टारकास्ट आणि आलेल्या लांब लचक सुट्यांचा. थोडक्यात 400 करोड बजेट असलेल्या वॉर 2 ला गुंतवणूक वसूल करण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार हे नक्की.
रेटिंग : ★★★☆☆ (3/5)
रिपोर्ट : हर्षदा वेदपाठक



