वामन केंद्रे यांची एक महिन्याची नाट्य दिग्दर्शन कार्यशाळा १९ मे पासून होणार सुरू

मुंबई – आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त व भारतातील एक सर्वोत्तम नाट्य दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक, एन. एस. डी. चे माजी संचालक व पद्मश्री पुरस्काराने ने सन्मानित प्रा.वामन केंद्रे
यांच्या एक महिना चालणा-या “नाट्य दिग्दर्शन कार्यशाळा” चे आयोजन तब्बल ३० वर्षांनी होत आहे.
सदर आयोजन दिनांक १९ मे ते १८ जून २०२६ या कालावधीत, मंगळवार ते शुक्रवार या दिवशी सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत राजर्षी शाहु सभागृह, ३रा मजला, शिवाजी मंदिर, दादर पश्चिम मुंबई येथे करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा ही १६ ते ७० वर्ष या वयोगटातील कलांवतांसाठी असणार आहे.

प्रा. वामन केंद्रे यांचे नाट्य प्रशिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान हे सर्वऋुत आहे. त्यांच्याकडे शिकलेले आणि नावारूपाला आलेले शेकडों कलावंत आज नाटक, चित्रपट, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, रेडिओ, नाट्य-चित्रपट शिक्षण इत्यादी माध्यमात केवळ अग्रेसर नाहीत तर देशात-विदेशात दबदबा निर्माण करून कार्यरत आहेत.
प्रा. केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांची नुस्ती नावे जरी नजरेखालून घातली तरी त्यांच्या अफाट योगदानाची कल्पना येते. झुलवा, एक झुंज वा-याशी, नातीगोती, दुसरा सामना, तीन पैशाचा तमाशा, काळा वजीर पांढरा राजा, राहिले दूर घर माझे, रणांगण, प्रेमपत्र, ती फुलराणी, अशी बायको हवी, गधे की बारात, लडी नजरिया, वेधपश्य, मध्यम व्यायोग, मोहनदास, जानेमन, गजब तेरी अदा, प्रिया बावरी, मोहे पिया, लागी लगन, राजदर्शन, सैंया भए कोतवाल, टेम्ट मी नॉट,ओह माय लव्ह, गजब तिची अदा आदि नाटके त्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत दिग्दर्शित केलेली आहेत.
प्रा. वामन केंद्रे यांना आत्तापर्यंत पाच राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. ज्या मध्ये संगीत नाटक अकादमी दिल्ली पुरस्कार , राष्ट्रीय कालीदास सन्मान( मध्य प्रदेश ) ब. व. कारंत स्मृती पुरस्कार तसेच मनोहर सींग स्मृती पुरस्कार( एन.एस.डी) व भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार सामील आहेत.
त्याचबरोबर राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान उज्जैन, रमेश सींग राष्ट्रीय रंग सन्मान पटना, पाच वेळा महाराष्ट्र शासन व्यावसायिक नाट्य दिग्दर्शन पुरस्कार, पद्मश्री दया पवार पुरस्कार , म. टा. सन्मान, सहयोग फाउंडेशन सन्मान , मराठवाडा गौरव पुरस्कार आदि अत्यंत महत्त्वाचे सन्मान/ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
आत्तापर्यंत केंद्रे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, जापान, सिंगापूर , मॉरीशस इत्यादी देशांबरोबरच भारतभर ४२५ च्यावर कार्यशाळा घेवुन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार घडवले आहेत.
या कोर्स मध्ये नाट्य दिग्दर्शन म्हणजे काय? दिग्दर्शनाची संकल्पना, नाट्य दिग्दर्शनाचे प्रकार, दिग्दर्शनाचे मूलभूत सिद्धांत, दिग्दर्शनाची मूलतत्वे, दिग्दर्शनाच्या विविध शैलि, विविध नाट्य प्रकाराचे आकलन, नाट्य विश्लेषण, नाट्य निर्मितीची प्रक्रिया, आशय, भाव व विचार समज, रंगभाषेचे ज्ञान व भान, दिग्दर्शकाचे लेखक, अभिनेता, डिज़ाइनर्स, निर्माता, परिक्षण व टीकाकार, प्रेक्षकांशी नाते, AI सारखे नवीन तंत्रज्ञान याचा अभ्यास व समर्पक वापर, नाटक, सिनेमा आणि टेलिविज़न दिग्दर्शनातील अंतर आदि विषयांवर शास्त्रशुद्ध पद्धतिने प्रात्यक्षिकासहित प्रशिक्षण दिले जाईल.
ही कार्यशाला रंगपीठ थिएटर व श्री. छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट मुंबईच्या वतीने आयोजित केली जात आहे.या कोर्समध्ये मोजक्याच सीट्स आहेत. दिग्दर्शन या माध्यमात खात्रीनं भविष्य घडवू इच्छिणा-या कलावंतानी सदर कार्यशाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



