
गोवा (पणजी ) विशेष प्रतिनिधी –
चित्रपटांचा आनंद घेण्याची दिव्यांग व्यक्तींची गरज पूर्ण करण्यासाठी सरकारने चित्रपटगृहांमध्ये फिचर फिल्म्सच्या सार्वजनिक प्रदर्शनाच्या वेळी सुलभताविषयक मापदंडांसाठी मार्गदर्शन तत्वे अधिसूचित केली आहेत. ही तत्वे सुस्पष्ट आणि सर्वसमावेशक आहेत. “त्यांच्या अंमलबजावणीसाठी देण्यात आलेली कालमर्यादा योग्य आहे आणि याच्याशी संबंधित खर्च देखील अवास्तव नाही,” असे सुस्पष्ट मत. क्युब सिनेमा टेक्नोलॉजीज चे सह-संस्थापक सेंथिल कुमार यांनी आज इफ्फीत व्यक्त केले.
इफ्फी 2024 च्या अनुषंगाने गोव्यातील कला अकादमीत आयोजित केलेल्या ‘चित्रपटगृहांमध्ये फिचर फिल्म्सचे प्रदर्शन: सुलभतेची समस्या’ यावर आधारित मास्टरक्लासमध्ये ते बोलत होते.सेंथिल कुमार चलचित्र कला आणि विज्ञान अकादमीच्या निर्मिती आणि तंत्रज्ञान शाखेचे देखील सदस्य आहेत.

याप्रसंगी बोलताना सेंथिल कुमार यांनी दिव्यांग प्रेक्षकांसाठी चित्रतलवर्णने पुरवण्यातील तांत्रिक आणि सर्जनशील दृष्टीकोनांची चर्चा केली.प्रमाणाबाहेरील कथन दर्शकांचे लक्ष विचलित करू शकते तर अपुरे वर्णन पडद्यावर चाललेल्या बाबी दर्शकांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचू शकत नाहीत याकडे लक्ष वेधत, त्यांनी श्राव्य वर्णनांमध्ये समतोल साधण्याच्या गरजेवर अधिक भर दिला. सामान्यतः, दिव्यांग व्यक्तींसाठी चित्रपटाचा सुमारे 15% भाग श्राव्य वर्णनाद्वारे समजावून सांगितलं जातो.
सर्वांना चित्रपटाचा अनुभव अधिक चांगल्याप्रकारे मिळवता यावा यासाठी तयार करण्यात आलेली चित्रतलवर्णने पुरवणारी साधने आणि श्राव्य वर्णन करणारी साधने यांच्यासह विविध सुलभता वैशिष्ट्यांवर देखील त्यांनी अधिक भर दिला.
- भारतीय सांकेतिक भाषेचा अर्थ पिक्चर-इन-पिक्चर पद्धतीने मांडणे आवश्यक आहे आणि सोबतच ते अचूक, सिंक्रोनाइझ केलेले असणे आवश्यक आहे तसेच त्याद्वारे श्रवण दोष असणाऱ्या व्यक्तींना स्पष्ट संदेश पोहोचणे आवश्यक आहे.



