काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना फोन.
मुंबई –
महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्रीपदावरुन निर्माण झालेली कोंडी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा करुन महायुतीचे सरकार स्थापन करण्यात कोणताही अडसर नाही असे आश्वस्त केले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह जो निर्णय घेतील तो आपल्याला आणि शिवसेना पक्षाला मान्य असेल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ठाण्यातील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सत्ता स्थापन करण्यास विलंब झाल्याने माध्यमांमध्ये महायुतीबाबत उलट सुलट तर्क लढवले जात होते. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली. यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. यासंदर्भात मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. राज्यात सरकार स्थापन करताना महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेचा कोणताही अडसर नाही. महाराष्ट्र हित आपल्यासाठी सर्वोच्च आहे. आपल्यात कोणतीही नाराजी नाही, महायुतीतील मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप पक्षश्रेष्ठी जो अंतिम निर्णय घेतील, त्यास आपला पाठिंबा असेल, असे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना कळवल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते पुढे म्हणाले की, निवडणुकीतील प्रचंड यश म्हणजे गेल्या अडीच वर्षात महायुतीने केलेल्या कामावर जनतेने दाखवलेला विश्वास आहे. महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केले. निवडणूक काळात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम केले. सर्वसामान्यांसाठी सरकार म्हणून काही ना काही करावे ही धारणा होती. त्यानुसार मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कॉमन मॅन म्हणून काम केले. अडीच वर्षात केलेल्या कामांतून आपण समाधानी आणि आनंदी आहोत. या काळात बाळासाहेबांचे विचार आणि आनंद दिघे साहेबांची शिकवण सोबत होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा पहाडासारखे पाठिशी उभे राहिले. मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी निधी दिला, भक्कम पाठबळ दिले. केंद्र आणि राज्यात समविचारी सरकार असल्याने राज्याला फायदा झाला, असे सांगत त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे आभार मानले.
लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली ही मला सर्व पदांपेक्षा मोठी वाटते, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. नाराज होऊन रडणारे नाही तर आम्ही लढणारे आहोत. जीव तोडून काम केले, मेहनत केली आणि लोकांमध्ये गेलो. शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करेन, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.