मनोरंजनमहाराष्ट्रविशेषशहर

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे बुधवारी उद्घाटन

मुंबई – सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. ही चित्रपट संस्कृति जिवंत ठेवण्यासाठी शासन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असून याचे एक पाऊल म्हणजे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेले दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, १७ सप्टेंबर रोजी या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी प्रभात फिल्म कंपनी निर्मित संत तुकाराम हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. हा उपक्रम पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या लघू नाट्यगृहात पार पडणार असून दुपारी ३ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल.

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाची स्थापना करण्यामागे प्रमुख उद्देश हा दर्जेदार चित्रपट बघणारा रसिकवर्ग घडविणे आहे. जुन्या काळातील गाजलेले आणि ऐतिहासिक महत्त्वाचे चित्रपट तसेच नव्या पिढीने निर्मित केलेले सकस, प्रगल्भ व विचारप्रवर्तक चित्रपट यांचा रसिकांना आस्वाद घेता यावा, याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील सांगितले.

उद्घाटनाच्या सोहळ्यात दाखविण्यात येणारा संत तुकाराम हा प्रभात कंपनीने १९३६ साली निर्मित केलेला एक ऐतिहासिक चित्रपट आहे. दिग्दर्शक विष्णुपंत दामले आणि शेख फतेलाल यांनी याचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाने केवळ मराठीच नव्हे तर जागतिक पातळीवरही लौकिक मिळवला. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगातील सर्वोत्तम दहा चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे रसिकांना मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाची झलक अनुभवता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button