ठाकरे बंधूंच्या ‘बस’ चे टायर पंक्चर – नवनाथ बन

मुंबई – बेस्ट’ च्या निवडणुकीत मुंबईकरांचा आशीर्वाद डुप्लिकेट ब्रँडला नाही, तर हिंदुत्वाच्या स्टॅण्डला
भाजपा चे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची जोरदार टीका
बेस्ट पतपेढी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रणीत पॅनल आणि शशांक राव यांच्या पॅनल ला मोठा विजय मिळाला आहे. गेल्या 9 वर्षांपासून वर्चस्व असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेल ला 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. सर्वच्या सर्व जागा जिंकत भाजपाप्रणीत पॅनेल विजयी झाले. मुंबईकरांचा आशीर्वाद डुप्लिकेट ब्रँडला नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या खऱ्या स्टॅण्डला आहे हे या निकालातून अधोरखित झाले आहे. ठाकरे बंधूंचे टायर या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत पंक्चर झाले अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी उबाठा सेनेवर बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“मुंबईत आमचाच ब्रॅंड चालणार” अशा मोठमोठ्या बाता मारणा-या उबाठा चे खा. संजय राऊत यांची बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर दातखीळ बसली आहे अशा शब्दांत श्री. बन यांनी राऊतांना लक्ष्य केले. बेस्टच्या निवडणुकीत मुंबईकरांनी थेट मतदानातून उबाठाचा धुव्वा उडवला आहे. थेट मतदानामुळे आता श्री. राऊत यांना ‘ईव्हीएम, व्होट चोरी’ असे नेहमीचे खोट्या आरोपांचे तुणतुणे वाजवता येणार नाही. खरे तर बेस्ट पतपेढीची निवडणूक पक्षीय पातळीवर घेऊ नये, असं भाजपाचे मत होतं. मात्र ‘सहकारातून स्वाहाकार’ करणाऱ्यांनीच या निवडणुकीत राजकारण आणले. या निवडणुकीत बेस्ट कर्मचाऱ्यांनी ठाकरे गटाला सणसणीत ठोसा मारून आगामी महापालिका निवडणुकीत ही हिंदुत्वाचा स्टॅण्ड कायम राहील, हे आपल्या मतदानातून दाखवून दिलं आहे. प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला हा विजय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आहे असेही त्यांनी नमूद केले.
मुसळधार पावसामुळे मुंबईत काही भागात अडचणी निर्माण झाल्या. मात्र कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ यंत्रणा कामी लावली आणि प्रवाशांची सुटका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आलेल्या संकटाला परतवून लावलं. प्रशासन सक्षम हातात असेल तर संकटाला कसं तोंड देता येतं हे मुंबईकरांनी पाहिलं असेही त्यांनी नमूद केले .
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पदावर असताना तुरुंगात गेलेले नेते संसदीय कायद्यांवर टीका करतात
संसदेतील कायदे राजकारणातील पारदर्शकता आणि साधनशुचिता कायम राखण्यासाठी आहेत. मोदी सरकारच्या काळात मनमानी कारभार कदापि चालणार नाही हे कळून चुकल्यामुळेच, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पदावर असताना तुरुंगात गेलेले नेते संजय राऊत, अनिल देशमुख, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, हेमंत सोरेन यांची भीतीने गाळण उडाली आहे. त्या भीतीतूनच संसदेतील कायद्यांबाबत असे बिनबुडाचे आरोप करत आहेत अशी टीका श्री. बन यांनी केली.



