देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहर

क्रेडाई-एमसीएचआयच्या दुसरे पुनर्विकासाचं प्रदर्शनात पाच हजार सोसायट्या सहभागी होण्याची शक्यता

मुंबई – मुंबई व परिसरातील जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांसमोरील पुनर्विकासाच्या महत्त्वपूर्ण समस्येवर मार्ग काढण्यासाठी त्यांना आवश्यक ती मदत, सहाय्य देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंका दूर करुन त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी क्रेडाई-एमसीएचआय ने पुढाकार घेतला आहे. क्रेडाई- एमसीएचआय पुनर्विकास सुलभता प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये 30 पेक्षा जास्त विकासक एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. सोसायट्यांना पुनर्विकास करताना येणारी आव्हाने, इतर माहिती एकाच व्यासपाठीवर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पुनर्विकास कसे होते, त्याचे कोणते प्रकार आहेत, सरकारच्या विविध धोरणांबाबत माहिती, अशा विविध बाबींवर यावेळी मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत देण्यात आली.

शनिवारी 12 एप्रिलला होणाऱ्या या प्रदर्शनासाठी आतापर्यंत 3100 सोसायट्यांनी नोंदणी केली आहे, या कार्यक्रमाला सुमारे 5 हजार सोसायट्या सहभागी होण्याची अपेक्षा आहे, गेल्या कार्यक्रमात 2 हजार पेक्षा अधिक सोसायट्या सहभागी झाल्या होत्या. याबाबत क्रेडाई- एमसीएचआयचे अध्यक्ष डोमनिक रॉमेल म्हणाले, पुनर्विकासाबाबत आवश्यक असलेली सर्व माहिती आम्ही या माध्यमातून एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन देत आहोत. त्याचा सोसायट्यांना मोठा लाभ होईल. पुनर्विकासाबाबत स्पष्टता व पारदर्शकता आणून हजारो गृहनिर्माण संस्थांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व आम्ही करत आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे ते म्हणाले.

रेडी रेकनर दरात राज्य शासनाने पाच वर्षांनंतर केवळ पाच टक्के वाढ केली आहे, ही फार चांगली व कौतुकास्पद बाब आहे, पुनर्विकासात त्याचा फारसा फरक पडणार नाही, जीएसटी इनपुट क्रेडिट यामध्ये बिल्डरला मिळत नाही, त्यामुळे यामध्ये जीएसटीला अॅड करण्याची मागणी आम्ही सरकारला केली आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने रेपो दरात कपात केली असली तरी त्याचा लाभ बॅंकांनी ग्राहकांना देणे गरजेचे आहे, तरच त्याचा परिणाम होऊ शकेल, असे ते म्हणाले. अमेरिकेने चीनवर 104 टक्के तर भारतावर 26 टक्के टेरिफ लावले आहे, याचा देशाला चांगला लाभ होईल, असा दावा त्यांनी केला. या प्रदर्शनात महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए यासारखे प्रमुख भागधारक सहभागी होतील, पुनर्विकासाबाबत विचार सुरु असणाऱ्या सोसायट्यांना एकाच छताखाली आघाडीच्या विकासक, वास्तुविशारद, नियोजक, वित्तीय संस्था, कायदेतज्ञांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळेल, असे डोमनिक रोमेल म्हणाले.

क्रेडाई-एमसीएचआयचे सचिव धवल अजमेरा यांनी, पुनर्विकास सुलभ करणे, गोंधळ दूर करणे, सोसायटी सदस्यांना आवश्यक ज्ञान पुरवणे यावर या प्रदर्शनात आमचा भर राहील, असे स्पष्ट केले. विकासकाची निवड करण्यापासून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत सर्वंकष मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे अजमेरा म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button