पूरग्रस्तांच्या मदतीला सिद्धिविनायक ट्रस्ट; मुख्यमंत्री निधीसाठी १० कोटींची मदत जाहीर

मुंबई – राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहे.

ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात आणि ट्रस्टी आचार्य पंकज त्रिपाठी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे मुख्यमंत्री मदत निधीसाठी १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली. “मागील काही दिवसांत राज्यातील विविध भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेती वाहून गेली, पिकं कुजली, भूस्खलनामुळे अनेकांचे जीवितहानीसह प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. या आपत्तीच्या काळात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सिद्धिविनायक ट्रस्ट हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीकडे जमा करीत आहे,” असे ते म्हणाले.

राज्यातील पूरग्रस्तांना मदतीची नितांत गरज असून नागरिक, संस्था, ट्रस्ट आपापल्या परीने मदत करीत आहेत. याआधी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शिर्डी साईबाबा संस्थान व शेगाव गजानन महाराज मंदिर ट्रस्टकडून मदतीची घोषणा करण्यात आली होती. आता सिद्धिविनायक ट्रस्टकडून झालेल्या या मोठ्या मदतीमुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.



