राणी मुखर्जी पोलिस दलाच्या समर्थनार्थ पुढे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अक्षय कुमार यांच्यासोबत मंचावरून सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी शुक्रवारी राज्य पोलिस मुख्यालयात आयोजित ‘सायबर अवेअरनेस मंथ २०२५’ च्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाल्या. महिला-प्रधान हिट फ्रँचायझी मर्दानी चित्रपट मालिकेत शूर महिला पोलिस अधिकारीची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या राणी मुखर्जी यांचे पोलिस दल व समाजाच्या सुरक्षेसाठी योगदानाबद्दल नेहमीच समर्थन राहिले आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल (IPS) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महिलांवर व लहान मुलांवर वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करताना राणी मुखर्जी म्हणाल्या :
“सायबर अवेअरनेस मंथच्या उद्घाटनाचा भाग होणे, माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. वर्षानुवर्षे माझ्या चित्रपटांतून मला अन्यायाविरोधात लढणारी आणि दुर्बलांचे रक्षण करणारी पात्रे साकारण्याची संधी मिळाली. खरं सांगायचं तर, मी थेट मर्दानी ३च्या शूटिंगवरून इथे आले आहे, त्यामुळे हा अनुभव अत्यंत वेगळा आहे. महाराष्ट्र पोलिसांची ही पुढाकार प्रशंसनीय आहे.”

त्या पुढे म्हणाल्या :
“आज सायबर गुन्हे – विशेषतः महिलांविरुद्ध आणि मुलांविरुद्ध – आपल्या घराघरात शांतपणे वाढत आहेत. एक स्त्री आणि आई म्हणून मला याची तीव्र जाणीव आहे की जागरूकता किती महत्त्वाची आहे. जेव्हा कुटुंबांना सुरक्षित राहण्याचे मार्ग आणि मदत कुठे मिळेल हे ठाऊक असते, तेव्हाच खरी सुरक्षा शक्य होते. या महत्त्वाच्या मोहिमेला प्राधान्य दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री, ACS साहेब व DGP मॅडम यांचे आभार मानते.”
सरकारच्या हेल्पलाइन क्रमांकांचे महत्त्व अधोरेखित करताना राणी म्हणाल्या :
“डायल १९३० आणि डायल १९४५ हे क्रमांक सर्व नागरिकांसाठी वरदान आहेत. एक कलाकार म्हणून मी पडद्यावर कथा जिवंत करते, पण एक स्त्री, आई आणि नागरिक म्हणून मला वाटते की कोणतेही मूल शांतपणे रडू नये, कोणतीही स्त्री असुरक्षित वाटू नये आणि कोणतेही कुटुंब सायबर गुन्ह्यांमुळे आपली शांतता गमावू नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
आपल्या भाषणाच्या शेवटी राणी मुखर्जी म्हणाल्या :
“चला, आपण आज संकल्प करूया की सतर्क राहू, आवाज उठवू आणि सुरक्षित डिजिटल जगासाठी एकत्र उभे राहू.”
राणी मुखर्जी आता त्यांच्या पुढील चित्रपट मर्दानी ३ मध्ये दिसणार असून तो २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित असून दिग्दर्शन अभिराज मीनावाला यांनी केले आहे




