महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची २ हजार वर्षे पुस्तकात; ‘सह्याद्रीची देणगी’ ३१ ऑक्टोबरला प्रकाशित.
मुंबई : महाराष्ट्राचा दोन हजार वर्षांचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि गौरवशाली परंपरा उलगडणारे ‘गिफ्ट ऑफ द सह्याद्री : द स्टोरी अँड ग्लोरी ऑफ महाराष्ट्र’ अर्थात ‘सह्याद्रीची देणगी : महाराष्ट्राची कहाणी आणि गौरव’ हे कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित होणार आहे. हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि.ने या २८० पानी पुस्तकाची घोषणा केली आहे. येत्या ३१ ऑक्टोबरला पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल.
पुस्तकाच्या घोषणाप्रसंगी पुरातत्त्व व संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे आणि ‘छावा’ चित्रपटाचे लेखक उन्मान बनकर उपस्थित होते.
सातवाहन काळापासून महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास
या पुस्तकातून सातवाहन काळापासून ते १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना होईपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास मांडण्यात आला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांच्या योगदानाचाही यात समावेश आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगा, अजिंठा-वेरूळ लेण्या, ऐतिहासिक किल्ले आणि नद्यांची उगमस्थाने यांची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, मराठा साम्राज्य आणि पेशवाईच्या इतिहासालाही यात स्थान देण्यात आले आहे.

संतपरंपरा आणि कर्तृत्ववान महिलांच्या योगदानावर भर
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख घडवणारी संतपरंपरा आणि वारकरी संप्रदाय यांचाही पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे. त्याचबरोबर राजमाता जिजाबाई आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांसारख्या कर्तृत्ववान महिलांचे योगदान अधोरेखित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि वारसा यांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, या दृष्टीने हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. इतिहासप्रेमी, अभ्यासक, वाचनालये आणि पुस्तकांचा वैयक्तिक संग्रह करणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
पुस्तकाचे नाव : सह्याद्रीची देणगी : महाराष्ट्राची कहाणी आणि गौरव
पृष्ठसंख्या : २८०
किंमत : २,५०० रुपये
प्रकाशक : हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि.
प्रकाशन : ३१ ऑक्टोबर, पुणे



