
मुंबई ( हर्षदा वेदपाठक ) – हनुमान या चित्रपटाला सर्व स्तरावर पसंत केले गेले. चित्रपटाने तुफान व्यवसाय देखील केला. तेजा सज्जा या दाक्षिणात्य अभिनेत्याला हनुमान या चित्रपटामुळे पूर्ण भारतभर ओळख मिळाली. या पार्श्वभूमीसह त्याचा मिराय हा नवीन चित्रपट येतोय, त्या चित्रपटाबद्दल तेजा सज्जा बरोबर केलेली बातचीत.

अलिकडच्या काळात पॅन इंडीया चित्रपट येत आहेत. त्याबद्दल काय सांगाशील?
मला पॅन इंडिया ही संज्ञा समजत नाही. आम्ही प्रामुख्याने तेलगु चित्रपट तयार करतो. पण मला माहित आहे की आपण एक चित्रपट तयार करत आहोत की जो आपल्या मातृभाषेत उपलब्ध आहे. आणि त्या रेषा आता मिटल्या आहेत. आता आमच्याकडे करण जोहर सर आहेत जे आम्हाला मोठ्या व्यासपीठीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत, जो आमच्यासाठी मोठा बदल आहे. या नविन सहयोगामुळे आम्ही आता एखाद्या हिंदी चित्रपटासारखेच आहोत आणि एक चांगला हिंदी चित्रपट करण्यासाठी खूप मेहनत घेत आहोत. दुसऱ्या भाषांमध्येही हा चित्रपट करण्यात आम्हाला खास आनंद आहे.
मिराय या चित्रपटासाठी होकार देण्यामागे काय कारण होते?
निर्मिती आणि बजेटचा विचार करता हा एक आव्हानात्मक चित्रपट होता. या बजेटमध्ये आम्ही चित्रपट बनवू शकू याची आम्हाला खात्री नव्हती. आमच्यावर खूप बंधने आणि मर्यादा होत्या. पण महत्वाकांक्षा मोठी होती. त्यामुळे थोडे डोके लढवून, व्हीएफएक्स न वापरता कसा चित्रपट बनवता येईल, याचा विचार आम्ही करायला लागलो. आम्ही खऱ्याखुऱ्या ठिकाणांवर जाऊन चित्रीकरण केले, आम्ही स्वतः सगळे चित्रण केले, बॉडी डबल्स किंवा ग्रीन मॅट सिक्वेन्स वापरले नाहीत. या चित्रपटाला भव्यदिव्य चित्रपट बनवण्यासाठी आम्ही असाधारण मेहनत घेतली. ट्रेलरमध्ये तेच दिसत आहे. खूप कमी तेलगु चित्रपट ऍक्शन आणि साहस असते. जर चित्रपट वेगवेगळ्या वयोगटांना आपलासा वाटला, जसे की काल्पनिक गोष्टी आवडणाऱ्या लहान मुलांना मिराय आवडेल, तरुणांना साहसी दृष्य आवडतील तर वृद्धांना पौराणिक कथा आणि इतिहास आपलासा वाटेल. सर्व वयोगटांना आवडेल असा चित्रपट सापडणे कठीण असते. निखळ मनोरंजन करणारा चित्रपट तयार करण्यास आमचे प्राधान्य होते. मी असे चित्रपट बनवतो जेणेकरुन पालक त्यांच्या मुलांसह थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहू शकतील.
तु पौराणिक कथांच्या प्रेमात आहेस का? तुझा पहिला चित्रपटही हनुमानावर आधारीत होता.
मला आपल्या इतिहासात खूप रस आहे आणि जेंव्हा मला आपल्या प्राचीन इतिहासाबद्दल, देवांबद्दल आणि धर्मग्रंथांबद्दल शिकता येते तेंव्हा मी खूष होतो. आम्ही काही ऍक्शन ऍडवेंचर चित्रपटाच्या माध्यमातून प्रवचन देऊ इच्छित नाही. माझा आधीचा चित्रपटही व्यावसायिक सुपर हिरो चित्रपट होता. त्यातही एक प्रेमकथा, बहीणीचे नाते होते आणि देवही होता. त्याचप्रमाणे हासुद्धा एक पूर्णपणे व्यावसायिक चित्रपट आहे. आणि त्यात इतर घटकही आहेत, पण त्याचबरोबर हा आपल्या इतिहासात असलेल्या उत्तरांबद्दलही आहे. यातून आम्ही दिलेला संदेश नव्या पिढीला नक्कीच आवडेल.
तुझ्या हनुमान या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. एवढ्या तरुण वयात हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कसे वाटते?
भारत सरकारकडून पुरस्कार मिळणे ही एकप्रकारची मान्यता मिळण्यासारखे आहे. ते एक व्यासपीठ आहे. पण त्याने फारसा फरक पडत नाही, कारणे माझ्या भविष्यातील कामासाठीही मला एवढेच प्रयत्न आणि संघर्षक करावा लागणार आहे. प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांना आवडायला पाहिजे. मला माझ्या क्षमतेपेक्षाही जास्त चांगले काम करावे लागते, माझ्या मानधनाचा त्याग करावा लागतो.
व्हीएफएक्ससाठीची अॅक्शन दृश्ये साकारताना आव्हाने जाणवतात काय?
चित्रपट तयार होताना काही आव्हाने नाहीत, मात्र चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर आव्हाने असतात. तुम्हाला काही गोष्टी आवडत नाहीत, मग त्यामध्ये बदल किंवा पुन्हा चित्रीकरण करावे लागते. ते आव्हानात्मक असते, पण व्हीएफएक्समुळे नाही.
भूमिका करतानाचे ताणतणाव तुम्ही कसे हाताळता? तू स्विच ऑन स्विच ऑफ पठडीतील अभिनेता आहेस का?
नाही.. मी माझा वेळ घेतो. एखादा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी काही तास जावे लागतात. भूमिकेतून बाहेर पडण्याची कला मला अजून साध्य झालेली नाही. मला वेळ लागतो. लोकांची विश्वासार्हता मिळवणे ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि ती मिळाल्यावर ती टिकवून ठेवणे अतिशय कठीण आहे. माझ्याकडून १०० टक्के प्रयत्न करणे एवढेच माझ्या हातात आहे. यापुढे सगळे काही देवाच्या आणि प्रेक्षकांच्या हातात आहे.
तुझी पार्श्वभूमी सांगशील आणि तू अभिनयाकडे कसा वळलास?
मी बालकलाकार होतो. दोन वर्षांचा असतानाच मी कामाला सुरुवात केली. माझा मोठा भाऊ मला खेळण्यांच्या दुकानात घेऊन गेला होता आणि चिरंजीवी सरांनी मला तिथे पाहिले आणि चित्रपटात भूमिका देऊ केली. तो एक मोठ्या बजेटचा चित्रपट होता. सुरुवातीला माझ्या पालकांनी नकार दिला, पण निर्मात्यांनी घरी येऊन माझ्या पालकांना समजावले. चुडालनी वुंडी हा तो चित्रपट… त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही. माझे अभिनेता होणे माझ्या नशिबात होते आणि आज मी इथे आहे.
तू तरुण आहेस आणि हनुमान या तुझ्या चित्रपटाने ४०० कोटीचा टप्पा पार केला आहे, या यशाकडे तू कसा पाहतोस?
मी याकडे माझे एकट्याचे यश म्हणून पहात नाही, तर ते संपूर्ण टीमचे यश असते. याऊपर ते माझे नाही तर हनुमानाचे यश होते. मला अजून बरीच मोठी मजल मारायची आहे आणि कठोर मेहनत करायची आहे, मी माझ्या यशाला फारसे गांभीर्याने घेत नाही. मला प्रत्येक चित्रपटात स्वतःला सिद्ध करावे लागेल. एखादी गोष्ट ऐकल्यावर मला उत्साह येतो आणि प्रत्येक वेळी काहीतरी नविन करण्यासाठी आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणून त्यांचे मनोरंजन करण्यासाठी मी उत्सुक असतो.
४०० कोटी चा टॅग एक अभिनेता म्हणून उपयोगी ठरतो का?
मी ज्याप्रकारचे चित्रपट निवडतो ते तयार करण्यासाठी मला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे मला हवे तसे चित्रपट निवडण्याचे स्वातंत्र्य माझ्याकडे आहे. मी करत असलेला प्रत्येक चित्रपट भव्यदिव्य आणि चांगला असला पाहिजे. ही गोष्ट मी प्रत्येक चित्रपटासाठी हे प्रकर्षाने पाळतो.
हनुमान चित्रपटाच्या यशाचा तणाव वाटतो का?
मी सांगितल्याप्रमाणे हनुमाननंतर मी पुन्हा शुन्यातून सुरुवात केली आणि पुढच्या चित्रपटासाठी तेवढीच मेहनत घेतली. या यशाचा वापर मी अधिक पैसा किंवा अधिक चित्रपट करण्यासाठी केला नाही. हनुमानच्या आधीच मी या चित्रपटासाठी होकार दिला होता आणि मी त्यावर कायम राहीलो.
दोन्ही चित्रपट ऍक्शन प्रधान आहेत. यापेक्षा वेगळे काही म्हणजे रोमॅंटीक किंवा कॉमेडी चित्रपटात काम करायला आवडेल?
कॉमेडी करायला मला खूप आवडेल. माझा पुढचा चित्रपट पूर्णपणे कॉमेडी आहे आणि तो एक पॅन इंडीया चित्रपट आहे. हिंदी प्रेक्षकांपर्यंतही तो पोहचेल.
मिराय हा चित्रपट करत असताना काय शिकलास?
मी करत असलेला प्रत्येक चित्रपट पूर्ण करण्यासाठी साधारणपणे एक ते दिड वर्ष लागते. कलाकार तंत्रज्ञांशी सलग दोन वर्ष दररोज भेट असल्यामुळे हा एक भावनिक प्रवास असतो. जसजसे सेटवर दिवस जाऊ लागतात, दर दिवशी मी अधिकाधिक शहाणा आणि शांत होत जातो. झोंबी रेड्डी हा नायक म्हणून केलेला माझा पहिला चित्रपट होता. मला आजही आठवतो. मी खूपच उतावीळ आणि साशंक होतो त्यावेळी. पुढील काही चित्रपटांच्या वेळी आणि नंतर सुद्धा. मात्र हनुमानच्या वेळी मी अधिक शांत झालो.
सामान्य माणसाची ताकद प्रेक्षकांना आपलीशी वाटते का?
हे फक्त हनुमानाबद्दल नाही, तर माझी ताकदही तीच आहे. मी एक सामान्य माणूस आहे जो काहीतरी महत्त्वाकांक्षी आणि मोठे करण्याचा प्रयत्न करतोव.
कोणता चित्रपट तुला प्रेरणादायी वाटतो?
शिकण्याची प्रक्रीया ही सुप्त पातळीवर सुरु असते. मी ती व्यक्तिरेखा काय करते यावरुन प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करतो. तसेच इतर कलाकारांकडे पाहून छोट्या छोट्या गोष्टी शिकतो. त्यांचे हावभाव कसे बदलतात ते पहातो. प्रत्येक अभिनेत्याकडून मी काहीतरी शिकतच असतो. मला अभिनेता नानीची संवेदनशीलता आवडते, तो ज्या प्रकारच्या कथांची निवड करतो, किंवा ते प्रेक्षकांपर्यंत कसे पोहचवतो ते मला आवडते.
चिरंजीवी सरांबद्दल काय म्हणशील?
ते तर सुपरस्टार आहेत. माझ्या कारकिर्दीची सुरुवात मी, त्यांच्याबरोबर केली असल्यामुळे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात फार आदर आहे

बॉलीवूडचा चित्रपट करण्याचा काही विचार आहे?
आता भाषेचा अडथळा राहीलेला नाही. मी हैदराबाद किंवा मुंबई कुठेही चित्रपट करु शकतो. आम्ही इतर भाषांमधील दिग्दर्शकांसोबत सहयोग करण्यास तयार आहोत आणि हे घडायला सुरुवातही झाली आहे. बनीआन्ना अक्की सरांबरोबर तामिळनाडूमध्ये चित्रपट करत आहेत, प्रशांत नील सर कर्नाटकचे आहेत आणि ते तारकन्ना या तेलुगु अभिनेत्याबरोबर चित्रपट करत आहेत. माझ्या हनुमान चित्रपटाचा दिग्दर्शकही रिषभ शेट्टीबरोबर चित्रपट करत आहे. भिन्न भाषिक कलाकार दिग्दर्शकांनी एकत्र येऊन काम करणे आता नवे राहीलेले नाही. जर फक्त हिंदी भाषिक चित्रपटातच काम करुन मी बॉलीवूड हिरो होणार असेन, तर मी भविष्यात नक्कीच याचा विचार करेन. माझ्या मते तर मी पॅन इंडीया चित्रपट तयार करत आहे.
रिमेक चित्रपटांना आता जास्त मान्यता मिळत आहे, असे तुला वाटत नाही का?
रिमेक एक स्टार पॉवर असते. रिमेक करणे सोपे काम नाही. मी दोन रिमेक केले आहेत. त्यापैकी एक कोरियन चित्रपट ओह बेबीचा रिमेक होता, जो खूप मोठा हिट ठरला होता. माझा त्यापुढचा चित्रपटही रिमेक होता, पण तो तिकीट खिडकीवर चालला नाही. रिमेकमध्ये तुम्हाला काहीतरी जादुई करावे लागते. जर मूळ चित्रपटापेक्षाही रिमेक यशस्वी ठरला तर त्याचा अर्थ त्यांनी नक्कीच काही तरी जादुई कामगिरी केली आहे असे समजावे.



