महाराष्ट्रविशेष

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही – अजित पवार

कर्जत विशेष प्रतिनिधी
माजी एखादी गोष्ट पटली नाही तर विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे परंतु आज काय पहात आहे. मला डेंग्यू झाला तर मला राजकीय आजार झाला अशी चर्चा होते अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.

कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार सभा आज पार पडली.

तुम्ही कामाच्या बाबतीत टेंशन घेऊ नका… आपलं नाणं खणखणीत आहे…असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला यावेळी दिला.

मावळ्यांना सोबत घेऊन ही रायगड राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केली. त्यानुसार
सर्वसामान्य जनतेला आपले प्रश्न सुटले पाहिजे असे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे असेही अजित पवार म्हणाले.

पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. या जिल्ह्याला नगर, पुणे जिल्हा जोडला जातो. इथल्या पर्यटनाला चालना दिली तर स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या योजना लोकांपर्यंत पोचवल्या जात आहेत. सर्व घटकांना अधिकार देण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या माध्यमातून करत आहोत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आम्ही साधूसंत नाही. अनेक वर्षे सरकारमध्ये काम केले आहे. वेगवेगळे पक्ष इतर पक्षासोबत जातात. आमची विचारधारा स्पष्ट आहे. अल्पसंख्याक, दलित व कुठल्याही समाजाला न दुखावता त्यांनी गुण्यागोविंदाने रहावे असा आमचा प्रयत्न आहे. आज राज्यात वेगळे चित्र आहे. प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. परंतु इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाही, तेढ निर्माण होता कामा नये ही भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे असे सांगतानाच सर्वांना वाटत आहे आरक्षण मिळाले पाहिजे. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. कुणावर अन्याय होणार नाही. इतरांना दिलेल्या आरक्षणाला धक्का न लावता संधी दिली जाईल अशी भूमिका सर्व पक्षांनी व्यक्त केली असल्याचे अजित पवार म्हणाले.

कोकणातील निसर्गाच्या देणगीला धक्का लागू नये असा प्रयत्न आमचा आहे. सह्याद्रीच्या द-या खो-यात दरडी कोसळतात त्यासाठी दरडप्रवण भागाला मदत करण्याची भूमिका घेतली तशी मदतही देत आहोत. महायुतीचा प्रयत्न हा आहे की, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. विरोधात राहून काम करता येणार आहे का? म्हणून आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला असेही अजित पवार यांनी सांगितले.

सुनिल तटकरे यांना रायगडमध्ये संधी मिळाली. त्यांनी या संधीचे सोने केले. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे. इथे तीन पक्षांची ताकद असताना इथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवली आहे याबद्दल अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले.

दरडप्रवण भागात कोकणात चार वेळा नैसर्गिक संकट आले. यावर ठोस निर्णय झाला पाहिजे यासाठी केंद्रसरकारच्या मदतीने चार हजार कोटीचा कार्यक्रम घेतला आहे. आपल्या कामाचा फायदा पक्षाला व्हावा. उद्योग इथे यावेत असा प्रयत्न आहे. अनेक लाख नोकऱ्या दिल्या आहेत. विरोधाला विरोध ही भूमिका माझी नाही आणि कधीही नव्हती आणि असणार नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आम्ही महाराष्ट्रात काय करु पहात आहोत हे शिबीरातून राज्यातील जनतेसमोर आणणार आहोत असेही अजित पवार यांनी सांगितले.

मरीन ड्राईव्ह इथे मराठी भाषा भवन उभे करत आहोत. मराठी भाषा टिकली पाहिजे तसे मराठी फलकही लागले पाहिजे असे कोर्टाने आदेश दिले आहेत. माझ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस कामानिमित्त आला तर तिथे सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत असे काम आम्ही लवकरच पूर्ण करत आहोत. न्हावा – शेवा रस्ता नवीन वर्षात होत आहेत.केंद्रसरकारच्या माध्यमातून नवीन उद्योग, काम कसे राज्यात येईल असा  प्रयत्न करत आहोत असेही अजित पवार म्हणाले.

राजकीय भूमिका मांडत असताना शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांना पुढे घेऊन आपली युती झाली आहे. राजकीय परिस्थिती बघून निर्णय घ्यावा लागतो. यातून एकही पक्ष सुटलेला नाही. येणार्‍या नवीन वर्षात सतत लोकांसमोर नम्रपणे संवाद साधावा लागणार आहे. लोकांच्या कामासाठी आम्ही बांधील आहोत असा शब्दही अजित पवार यांनी दिला.

*अजितदादांच्या नेतृत्वाखालील गुरुवारी होणारे विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही – सुनिल तटकरे*

महाराष्ट्रात मजबूतीने पक्षाला उभे करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा असून अजितदादांच्या नेतृत्वाखालील गुरुवारी होणारे विचार शिबीर हे देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी कर्जत येथील निर्धार सभेत व्यक्त केला.

ही केवळ राष्ट्रवादीची सभा आहे आणि श्रीवर्धनला झाली ती तीन पक्षांची होती असा टोला लगावतानाच तुम्ही आज जो निर्धार दाखवला त्याबद्दल कर्जत खालापूरवासियांना सुनिल तटकरे यांनी धन्यवाद दिले.

दादा तुम्ही काम केले नसते तर आज ४३ आमदारांची ताकद आपल्या पाठीशी उभे राहिले नसती असा टोलाही अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेवर सुनिल तटकरे यांनी लगावला.

धर्मनिरपेक्ष विचार घेऊन आम्ही स्वच्छ भूमिका घेतली आहे. आम्हाला विकसित महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला सामोरे जायचे आहे. आरक्षणापासून मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळासाठी जो निधी देऊन सर्वधर्मसमभाव ठेवून महायुतीच्या माध्यमातून काम करत असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.

जो निर्णय घेतला आहात त्यापाठीशी राज्यातील जनता उभी राहिली आहे. या मतदारसंघात उरलेल्या मतदारसंघापेक्षा हा पुढे असेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

१९८४ मध्ये युवक अध्यक्ष म्हणून आलो होतो. ४० वर्षात जे घडले नाही ते आज कर्जतवासियांनी करुन दाखवले हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.


महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे आदींनी आपले विचार मांडले.

कर्जत – खालापूरच्या सर्वांगिण विकासाची जाहीर निर्धार सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्जतच्या पोलीस मैदानावर पार पडली.

‘घड्याळ तेच वेळ नवी’ ! ‘निर्धार नवपर्वाचा’ हे घोषवाक्य आज कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसची ही जाहीर सभा झाली.

याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर भव्य रॅलीने अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे,जिल्हाध्यक्ष हनुमंत पिंगळे, प्रदेश सचिव उल्हास भुर्के, दत्तात्रय मसुरकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button