देश-विदेशमनोरंजनविशेष

“स्वराज” ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अगणित वीरांची आणि त्यांच्या अदम्य साहसाची गाथा आहे: अनुराग सिंह ठाकूर

मुंबई – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह  ठाकूर यांनी आज मुंबईत ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईमवर “स्वराज” च्या पहिल्या सीझनचा शुभारंभ  केला.

यावेळी बोलताना ठाकूर म्हणाले, “आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे आणि आपल्या स्वातंत्र्याच्या त्या सर्व अनाम वीरांना खरी श्रद्धांजली आहे, ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “आझादी का अमृत महोत्सव” या राष्ट्रीय अभियानापासून प्रेरणा घेऊन ही मालिका सुरु करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. ऑगस्ट 2022 मध्ये सुरू झालेली ही मालिका भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शौर्याच्या कथा आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. “ही अशी युद्धे आहेत जी इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवलेली आहेत” असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण  मंत्री म्हणाले. “स्वराज” ही या अनाम वीरांची आणि त्यांच्या अदम्य साहसाची कहाणी आहे असे ते म्हणाले.

या मालिकेविषयी सविस्तर माहिती देताना ठाकूर म्हणाले, आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यातील अनाम स्वातंत्र्यवीरांचा परिचय या 75 भागांच्या मालिकेत आहे. आपल्याला वसाहतवादाचा अर्थ, मूळ आणि परिणाम समजून घेण्यास ती मदत करेल असे मंत्री म्हणाले. पूर्वी भारताचा इतिहास परकीय आक्रमक आणि राज्यकर्ते त्यांच्या राजकीय, वैचारिक आणि आर्थिक हितसंबंधांनुसार लिहीत होते. या ऐतिहासिक मालिकेत ‘स्वराज’ ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ऐतिहासिक घटनांचा व्यापक संदर्भ देण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना देशाची भावना आणि वसाहतवादी राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा आपला 500 वर्षांचा अथक संघर्ष समजण्यास मदत होईल असेही त्यांनी उद्धृत केले.

स्वत:च्या समृद्ध इतिहासाचा अभिमान बाळगण्याचे महत्त्व विशद करताना ठाकूर म्हणाले की ज्यांना आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा अभिमान वाटत नाही ते कधीही मोठे भविष्य घडवू शकत नाहीत. देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवायचे असेल, तर तरुण पिढीमध्ये आपल्या महान इतिहासाचा अभिमान जागृत करावा लागेल, असेही ते म्हणाले. अमृतकाळाच्या आगामी 25 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आम्ही ‘विकसित भारत’च्या दिशेने अधिक वेगाने प्रगती करू, असा पुनरुच्चार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी केला.

उपस्थितांना संबोधित करताना, प्राइम व्हिडिओ, इंडियाचे कंट्री डायरेक्टर, सुशांत श्रीराम म्हणाले, “हा उपक्रम भारताची अद्वितीय संस्कृती आणि इतिहासाचे प्रदर्शन आणि उत्सव साजरा करण्याची, आणि भारताच्या सृजनात्मक परिसंस्थेला बळकटी देण्याची आमची वचनबद्धता दर्शवतो, ज्याची कल्पना गेल्या वर्षी ॲमेझॉन इंडिया आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्यात स्वाक्षरी झालेल्या प्रतिबद्धता पत्रात करण्यात आली होती.”

“स्वराज” चे निर्माते अभिमन्यू सिंह यांनी सांगितले की, या मालिकेत 1498 मध्ये वास्को द गामाच्या आगमनापासून ते 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा भारताचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

“जेव्हा वास्को द गामाने भारतात प्रवेश केला, तेव्हा आपला देश त्यावेळी सर्वात श्रीमंत देश म्हणून गणला जायचा. जगाच्या एकूण जीडीपी पैकी भारताचे योगदान जवळजवळ 24 टक्के होते. पण, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात स्थापित झाल्यानंतर भारताच्या संघर्षाला सुरुवात झाली. मात्र, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले” असे ते म्हणाले.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विविध रंगी कार्यक्रमात भारताच्या समृद्ध कला आणि संस्कृती तसेच नृत्य प्रकार आयोजित करण्यात आले. एका संगीतरम्य  कथानकातील एका आकर्षक अदाकारीने गेल्या पाच शतकांमध्ये मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लाखो सामान्य भारतीयांच्या दुर्दम्य भावनेचे चित्रण सादर करण्यात आले.

स्वराज’ या मालिकेचे प्रसारण 14 ऑगस्ट 2022 मध्ये डी डी राष्ट्रीय वाहिनीवर हिंदी मधून आणि त्यानंतर नऊ प्रादेशिक भाषांमधून (तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराती, बंगाली, ओडिया आणि आसामी) दूरदर्शन वर सुरू झाले. “स्वराज” हा कार्यक्रम प्रसारणासाठी व्यावसायिकरित्या संशोधन करणाऱ्या आणि उच्च दर्जाच्या सामग्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या अशा कॉन्टिलो पिक्चर्स प्रॉडक्शन हाऊसकडे सोपवण्यात आला होता, जो ओ टी टी व्यासपीठासाठी देखील अनुकूल आहे. “स्वराज” हा कार्यक्रम आता ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ वर उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यात याचे 10 भाग असतील आणि ते – मराठी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि गुजराती या 7 प्रादेशिक भाषांमध्ये देखील उपलब्ध असतील. दर्शकांच्या सोयीसाठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत सबटायटल्स अर्थात उपशीर्षकेसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button