ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
मुंबई – अभिनेता सयाजी शिंदे यांना पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिल्याची घोषणा करतानाच पक्षात त्यांचा योग्यपध्दतीने आदर राखला जाईल आणि सामाजिक कार्याबरोबर राजकीय क्षेत्रात त्यांची कर्तबगारी दिसेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
आज एमसीए लॉन्ज वानखेडे स्टेडियम येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडली.सयाजी शिंदे यांचे काही चित्रपट मी पाहिल्याचे सांगताना अजित पवार यांनी महाराष्ट्रातील कलाकार पुढे आले की मला अभिमान वाटतो अशा शब्दात कलाकारांचे कौतुक केले.
सिनेमातून आणि सामाजिक कार्यातून समाजात जागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. अनेक सामाजिक उपक्रमही त्यांनी राबविले आहेत. चांगल्या संकल्पना त्यांच्याकडे आहेत असेही अजित पवार म्हणाले.बॉलीवूड ते टॉलीवुडपर्यंत सयाजी शिंदे यांनी आपला ठसा उमटवला आहे.आता अभिनेत्याबरोबर सयाजी शिंदे हे नेताही होणार आहेत असा विश्वास ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
आजपर्यंत सामाजिक बांधिलकीने त्यांनी काम केले आहे.राजकारणाचाही त्यांना अभ्यास आहे. तुमच्या येण्याने पक्षाला शक्ती मिळणार आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.सिनेमामध्ये मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या आहेत. मात्र मी राजकारणात येईन असे कुणालाही वाटले नाही.वेळेचं भान ठेवून कामे झाल्याने दादांचा आदर वाटला. त्यामुळेच मी येत्या आठ दिवसात निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून चांगले काम करु शकतो हे वाटले. पक्षाची शिस्त आवडली. पक्षाने शेतकऱ्यांविषयी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत आणि या पक्षात मला विश्वास वाटला म्हणून प्रवेश केल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले. यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांचे पक्षामध्ये स्वागत अजितदादा पवार यांनी केले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार विक्रम काळे, आमदार सरोज अहिरे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.