कीर्तन परंपरेने दिलेले आत्मबल महत्त्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे सोनी मराठी वाहिनीमार्फत आयोजित ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून, निरुपणातून, अभंगातून जे विचार समाजात पोहोचवले, जे समाज प्रबोधन केले, ते अतिशय अवर्णनीय आहे. कीर्तन ही आपली सनातन परंपरा असून ती कधीही संपू शकत नाही किंवा नाश पावू शकत नाही. ज्या काळात कीर्तन परंपरा सुरु झाली, तो काळ परकीय आक्रमणाचा होता. परकीय आक्रमक आपल्या श्रद्धास्थानांना उद्ध्वस्त करत होते, आम्हाला गुलाम करत होते, अशा परिस्थितीत संतांनी वारकरी परंपरेतून, कीर्तनातून, विचारातून प्रचंड लोकप्रबोधन केले आणि सामान्य माणसाला भक्ती परंपरेशी जोडून तो निराश होणार नाही, असा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अठरापगड जाती कीर्तन परंपरेशी जोडल्या गेल्या आहेत. आपण सगळे वैष्णव आहोत, अशी भावना कीर्तनकारांनी तयार केली. तीच परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांनी वीरतेमध्ये परिवर्तित केली. अठरापगड जातीचे लोक, वारकरी, माळकरी, टाळकरी, शेतकरी, बलुतेदार, अलुतेदार यांच्यातील पौरुष जागृत करुन देव, देश, धर्माकरता एकत्र करुन स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्याच्या स्थापनेमध्येही संत शक्तीचा, कीर्तनशक्तीचा, प्रबोधनाचा प्रचंड वाटा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्याकडे दुष्काळ, अतिवृष्टी असा संकटकाळ उद्भवतो. पण, त्या काळात प्रत्येक गावात हरिपाठाचा, कीर्तनाचा, काल्याचा कार्यक्रम होतो. या सगळ्यातून जे आत्मबल मिळते, त्यातून शेतकरी, शेतमजूर, बलुतेदार पुन्हा उभा राहतो, आव्हानांचा सामना करतो. कीर्तन परंपरेने दिलेले हे आत्मबल महत्त्वाचे आहे. म्हणूनच कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, या रिअॅलिटी शोची सुंदर संकल्पना मांडणाऱ्या सोनी मराठीचे मनापासून अभिनंदन.

यावेळी सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचे सीईओ गौरव बॅनर्जी, विचारवंत सदानंद मोरे, ह. भ. प. राधाताई सानप महाराज, ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.