महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

शालेय शिक्षण खात्यातील गोंधळावरून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई – शालेय शिक्षण खात्यात सुरू असलेल्या गोंधळावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशेषतः दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेत होत असलेल्या विलंबावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

अकरावी प्रवेशातील अनागोंदीवर आक्षेप

आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, दहावीचा निकाल लागून एक महिना उलटला तरी अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली नव्हती. १३ मे रोजी निकाल लागला, मात्र ऑनलाईन अर्ज प्रणालीत अनेक अडचणी आल्या. काही ठरावीक शहरांसाठी असलेली ही प्रणाली अचानक राज्यभर लागू करण्यात आली, ज्यामुळे पहिल्याच दिवशी वेबसाईट क्रॅश झाली. १० जून रोजी जाहीर होणारी पहिली यादी २६ जूनपर्यंत लांबणीवर पडली आणि तीही वेळेत जाहीर झाली नाही. “आज यादी लागू शकते किंवा नाही हे देखील निश्चित नाही,” असे ते म्हणाले.

दरम्यान, पत्रकार परिषद सुरू असतानाच पहिली यादी जाहीर झाल्याचे वृत्त आले. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, “आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आणि पहिली यादी जाहीर झाली. दादा भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे.” अशी मागणी केली.

सरकारच्या १०० दिवसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

देवेंद्र फडणवीस सरकारच्या १०० दिवसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठाकरे यांनी अनेक खात्यांमध्ये गोंधळ आणि घोटाळे सुरू असल्याचा आरोप केला. “फडणवीस यांच्या सरकारचे १०० दिवस उलटले आणि ही पॉलिसी केली, ती पॉलिसी केली असे सांगत आहेत. अनेक खात्यात गडबड घोटाळे सुरू आहेत. शालेय शिक्षण खात्यात जास्तच घोळ घातले आहेत. आताच्या मंत्र्यांनी बौद्धिक घोळ घातला आहे,” असे ठाकरे म्हणाले.

दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी

“या घोळाला जबाबदार कोण आहे? ती कंपनी निवडली कोणी? काही अनुभव नसताना तिला काम का दिले? अधिकारी यांच्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार का नाही?” असे प्रश्न त्यांनी विचारले. दादा भुसे यांच्याकडून शालेय शिक्षण खाते काढून घ्यावे आणि त्यांना मंत्रीपदावरून दूर करावे, अशी मागणी त्यांनी केली. पहिली यादी जाहीर झाली असली तरी, दुसरी यादी ९ तारखेला (९ जुलै) जाहीर होणार असल्याने इतका वेळ कशाला लागतो, असा सवालही त्यांनी विचारला.

आंदोलनाचा इशारा

जर आज यादी लागली नाही तर युवासेना राज्यभर आंदोलन करेल आणि दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करेल, असा इशारा त्यांनी दिला होता. पहिली यादी जाहीर झाल्याने तत्कालिन आंदोलन टळले असले तरी, प्रवेश प्रक्रियेतील विलंबाबाबत त्यांचा आक्षेप कायम आहे.
इतर मुद्द्यांवरही सरकारवर टीका आदित्य ठाकरे यांनी केवळ शिक्षणच नाही, तर राज्यातील इतर समस्यांवरही भाष्य केले. “राज्यात अनेक लोकांचे हाल आहेत, शेतकरी, महिला यांचे हाल होत आहेत,” असे ते म्हणाले. “यांनी आता ठरवून द्यावे की दिवाळीनंतर कॉलेज सुरू करणार आहोत. कारण काही विद्यार्थी आता टेन्शन घेतात. सगळ्यांचे गुणगौरव सोहळे पूर्ण झाले आहेत. आता तरी विद्यार्थ्यांवर लक्ष देणार आहेत की नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “घाणेरडे राजकारण बाजूला ठेवा, स्वतःचे सरकार आणि मंत्रिपद द्यायला २ महिने लागले, हा सगळा घोळ निस्तरायला किती महिने लागणार,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button