मुंबई – मराठी वेब सिरीज ‘लंपन’ ला 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार मिळाला आहे. उल्लेखनीय कथाकथन, उच्च निर्मिती मूल्ये आणि अपवादात्मक कामगिरी यासाठी या वेब सिरिजला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित ‘लंपन’ ही एका स्वप्नाळू मुलाची अपार उत्सुकता असलेली कथा आहे.
डिजिटल सामग्रीमधील नावीन्यपूर्णतेचा उत्सव साजरा करणारा हा पुरस्कार, एक आकर्षक आणि विचारप्रवर्तक कथा वितरीत करण्याच्या त्यांच्या समर्पणाबद्दल निर्मात्यांना आणि लंपनच्या मागे असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मला प्रदान करण्यात आला.
डिजिटल सामग्रीमधील सर्जनशीलतेची भरभराट ओळखून, 54 व्या आवृत्तीमध्ये सुरू करण्यात आलेला सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील उत्कृष्ट कथाकथनाचा गौरव करण्यासाठी एक परिवर्तनात्मक मैलाचा दगड आहे. जागतिक मनोरंजनावरील ओटीटी प्लॅटफॉर्मचा वाढता प्रभाव ओळखून या वर्षी पाच वेब सिरीज त्यांच्या कलात्मक तेज, कथाकथन चातुर्य, तांत्रिक उत्कृष्टता आणि सांस्कृतिक प्रभावासाठी निवडल्या गेल्या आहेत.
सर्वोत्कृष्ट ओटीटी वेब सिरीज पुरस्कार रुपये 10,00,000 रोख पारितोषिकासह दिला जातो, जे निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म दरम्यान सामायिक केले जातील. याशिवाय मालिकेच्या यशातील योगदान ओळखून वैयक्तिक प्रमाणपत्रेही दिली जातात.
हा पुरस्कार मनोरंजन क्षेत्रातील सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्णता जोपासण्याची इफ्फीची वचनबद्धता दृढ करतो. भारतीय भाषांमध्ये उच्च गुणवत्तेच्या सामग्री निर्मितीला प्रोत्साहन देऊन आणि जागतिक निर्माते आणि प्लॅटफॉर्म्समध्ये सहकार्य वाढवून, डिजिटल कथाकथनाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान बळकट करण्याचे इफ्फीचे उद्दिष्ट आहे.