गृहमंत्रीपदासह सर्व विषयांवर महायुतीच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेणार
सातारा ( प्रतिनिधी )- गृहमंत्रीपदासह सर्व विषयांवर महायुतीच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असून त्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारे स्थिर सरकार देण्याला आमचे प्राधान्य असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. सातारा येथील दरे गावातून मुंबईला परतण्यापूर्वी त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपले हे मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दररोज 8 ते 10 सभा करत असल्याने प्रचंड धावपळ झाली होती. यातून थोडासा आराम करण्यासाठी दरे मुक्कामी आलो असून आपली प्रकृती थोडी खराब होती मात्र आता आपली प्रकृती ठीक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
राज्यातील जनतेने आजवर कधीही कुणाला दिले नाही एवढे भरभरून मतदान आम्हाला केले आहे. राज्यभर लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांनी मतांचा अक्षरशः वर्षाव केला आहे. या निवडणुकीत त्यांना आम्ही काही आश्वासने दिलेली होती. आता ती पूर्ण करण्यासाठी एक मजबूत आणि स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न महायुती म्हणून आम्ही करू असे सांगितले.
मुख्यमंत्री पदाबाबत गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी कुणालाही मुख्यमंत्री करावे त्याला आपले आणि शिवसेनेचे पूर्ण समर्थन असेल असे मी तेव्हा सांगितले होते. आता गृहमंत्रीपदासह अन्य विषयांवर महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते आम्ही एकत्र बसून चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. महायुती मधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये पदासाठी कोणतीही चढाओढ नसून तिघात अतिशय उत्तम समन्वय आहे आणि समन्वयाच्या भूमिकेतूनच सारे निर्णय घेतले जातील असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.