मुंबई (हर्षदा वेदपाठक) – मागील काही महिन्यांपासून पुष्पा दोन या चित्रपटाचा खूप बोलबाला ऐकायला येत होता. खास करून या चित्रपटाच्या भाग एकला भारतभर सर्वस्तरावर पसंत केले गेले. त्यामुळे भाग दोनची लोक आतुरतेने वाट पाहत होतेत.असा हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे.
ट्रेड पंडितांच्या मते भारतभरात हा चित्रपट भरघोस कमाई करून, आतापर्यंतचे बॉक्स ऑफिस वर असलेले सगळे रेकॉर्ड मोडेल अशी वर्तता आहे. त्यात या चित्रपटाचे बजेट हे 500 करोड असून एकंदरीत पहिल्या आठवड्यात किंवा काही दिवसांमध्ये हा चित्रपट आपले गुंतवलेले पैसे तर वसूल करेलच. परंतु दीड हजार ते दोन हजार करोडचा गल्ला जमा करेल अशी शक्यता काही ट्रेड पंडित वर्तवतात. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी मुलाखती जरी दिल्या नसल्या तरी दोघांनी भारतभर सिटी टूर करून चित्रपटाची बऱ्यापैकी हवा तयार केली आहे. त्याचाच फायदा या चित्रपटाचे, पहिल्या आठवड्यातील सगळे शो हाउसफुल झाल्याचे चित्र दिसून येते.
पुष्पा दोन या चित्रपटामध्ये श्रीवल्ली आणि पुष्पा राजचे लग्न झाले असून, दोघेही सुखात नांदत आहेत. एकदा श्रीवल्ली, पुष्पाला सीएम बरोबर फोटो काढून घेऊन ये असं लाडिकपणे सांगते. परंतु या फोटो घेण्याच्या कृतीमध्ये पुष्पाला अपमानाला सामोरे जावे लागते. त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काय घडामोडी घडतात.पुष्पा राज आणि इन्स्पेक्टर शेखावत यांचा काट्याची टक्कर पुढे=काय रंग घेते. त्यावर पुष्पा 2 या चित्रपटाचे कथानक आधारित आहे.
पुष्पा एकच्या तुलनेत पुष्पा दोनचे कथानक म्हणावे तितके खिळवून ठेवणारे नाही. परंतु ती कसर व्हीएफएक्स, मारधाड आणि नृत्याने भरून काढलेली पाहायला मिळते. भाग एक प्रमाणे भाग दोन मध्ये, प्रत्येक दृश्यामध्ये, अलू वगळता इतर कलाकार उठून दिसत नाहीत. त्यामुळे चित्रपटाचा साचा थोडासा ढासळतो. चित्रपटभर महिला कलाकार आणि सर्वसामान्य महिला यांना दिलेला मान मात्र लक्षणीय आहे.
पुष्पा एक या चित्रपटांमध्ये चमकलेल्या आलू अर्जुन चा तो अभिनय हा आतापर्यंत त्याने केलेल्या सगळ्या चित्रपटापासून वेगळा होता. त्याचेच पुढचे कथानक भाग दोन मध्ये पाहायला मिळते. आणि तुमच्या लक्षात असेलच पार्ट एक साठी आलू अर्जुनला राष्ट्रीय पारितोषिक देखील मिळाले होत. पुष्पा दोन मध्ये आलू अर्जुन, पुष्पा राज म्हणून आपल्याला त्याची वेशभूषा, रंगभूषा, बॉडी लँग्वेज यावरून भुरळ घालतो. जेणेकरून त्याचा अभिनय, त्याची बॉडी लँग्वेज दीर्घकाळ लक्षात राहते आणि तो अल्लू अर्जुन नसून समोर पुष्पा म्हणून उभा आहे याची जाणीव होते. चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये आलू ने धारण केलेल्या कालीमातेचा वेश आणि देवीला खुश करण्यासाठी केलेले नृत्य हे चित्रपटाची तसेच त्याच्या अभिनयाची जमा बाजू म्हणता येईल. एक स्त्री म्हणून नाचताना आणि अभिनय करताना त्याने जे स्त्रीत्व जपले ते लाजवाब असल्याचे पाहायला मिळते. पुष्पा दोन हा चित्रपट खास करून ॲक्शन प्रमुख असल्याने असून सुद्धा आलू अर्जुन भावनिक दृश्य देताना भावून जातो. विशेष म्हणजे भाग एक पेक्षा भाग दोन मध्ये अल्लुचे भावनिक रूप लक्षात राहते. खरं सांगायचं तर पुष्पा दोन हा चित्रपट आलूचा चित्रपट आहे आणि त्याची सत्ता तो इथे कायम राखताना दिसून येतो.
पहिल्या भागाप्रमाणे रश्मिका मंडाना हिला येथे फारसावा नाहीये. गाण्यांमध्ये मात्र ती लक्षणीय ठरते. आलू आणि रश्मिकाची केमिस्ट्री भाग एक प्रमाणेच जुळताना दिसून येते. स्वामी या गाण्यात आलु आणि रश्मिकाला पाहताना सुखदता वाटते.
मल्याळी चित्रपटसृष्टी मध्ये उदयास पावलेला फहाद फासिल हा कलाकार इन्स्पेक्टर शेखावत म्हणून विविधता देताना दिसतो त्याची आणि पुष्पाची असलेली दुश्मनी इथे देखील कायम राहिली आहे. परंतु पुष्पा समोर तो तोडीस तोड अभिनय करताना दिसतो. अगदी सामान्य दृश्यामध्ये देखील तो खिळवून ठेवतो. त्यामुळे आलू बरोबरच चित्रपटांमध्ये लक्षात राहतो तो फहाद. रमेश राव आणि जगपती बाबू तसेच इतर कलाकारांनी उत्तमपैकी आपल्या भूमिका वठवल्याचे पाहायला मिळते. सोबत लक्षात राहते ते श्रीलीलाचे आयटम सॉंग .
मिरेसा आणि ब्रोएक यांची सिनेमॅटोग्राफी चित्रपटाचा प्रत्येक मूड आणि रंग उत्तमरीत्या टिपते. भाग एक नंतर भाग दोनसाठी निर्मात्याने वाढवलेल्या बजेटचा सर्वोत्तम फायदा या कॅमेरा मधून घेतलेला दिसून येतो. इतकेच नव्हे तर धारदार संकलन,लाईट,सेट्स, विएफएक्स यावर देखील हात सोडून खर्च केलेला पाहायला मिळतो. त्या आधारावर कलाकारांनी केलेला अभिनय या टेक्निकल पार्श्वभूमीवर जिवंत वाटतो. चित्रपटाचे संवाद हे प्रत्येक कलाकाराला चपखलरीत्या दिलेले असून, त्यातील वन लाइनर वाक्ये अधिक लक्षात राहतात. इतकेच नव्हे तर ॲक्शन मधील अनेक दृश्य ही नाविन्यता देताना दिसतात, ज्याचा फायदा कमकुवत कथानकला पकडून ठेवताना होतो.
देवी श्री प्रसाद यांचे संगीत भाग एक प्रमाणे श्रवणीय नसले तरी भाग दोन मध्ये त्यांनी बऱ्यापैकी काम सावरून घेतले आहे. देवी श्री प्रसाद आणि साम सी. एस. यांचे पार्श्वसंगित चित्रपटाच्या मूडला साजेसे ठरते
दिग्दर्शक सुकुमार यांनी आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दी मध्ये अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे विषय हे वेगळे असतातच सोबत प्रमुख कलाकाराला एक वेगळी ओळख देणे ही त्यांची खासियत राहिली आहे. पुष्पा दोन मध्ये देखील तेच दिसून येते. मात्र चित्रपटाची लांबलेली लांबी ही, सुरुवातीच्या जपानमध्ये असलेल्या दृश्याला कात्री देवून कमी करता उ असती. ते दृश्य कमी केले असते तरी काही बिघडले नसते असे दिसते.पुष्पा दोन हा चित्रपट तीन तास वीस मिनिटांचा असून पाहताना आपल्यालाच दमायला होते. परंतु एकंदरीत अनुभव पाहता एकदा पुष्पा दोन ला भेट द्यायला हरकत नाही. इतकेच नव्हे तर 2021 साली प्रदर्शित झालेल्या पुष्पा एक चा भाग यायला 2024 झाले. परंतु येत्या काही महिन्यांमध्ये कदाचित पुढच्या वर्षी पुष्पा दोनचा भाग देखील प्रदर्शित होईल असे दिसते. पुष्पा आणि शेखावत यांच्यामधील दुश्मनी दाखवताना दिग्दर्शकाने मोक्याच्या क्षणी केलेला इंटरवल लक्षात राहतो. परंतु क्लायमॅक्स मध्ये चित्रपटात राजकारणाच्या मुलाला ठार मारणे आणि पुष्पाच्या सावत्र भावाने त्याला फॅमिली मध्ये शामिल करणे हा विरोधाभास मात्र सुरू असलेल्या कथानकाला खीळ घालतात. ॲक्शन ड्रामा आणि भावनिक स्टोरी यांची सरमिसळ करताना दिग्दर्शक यशस्वी ठरतो. तसेच संपूर्ण चित्रपट हा आलू अर्जुनचा जरी असला तरी चित्रपटाचा सुकाणू मात्र दिग्दर्शकाच्या हातीच दिसून येतो. पुष्पा दोन द्वारे क्लास आणि मास या दोघांना एकत्र बांधण्यात दिग्दर्शक सुकुमार यांना यश आले आहे. सुगंधी नसलेल्या पुष्पाला एकदा भेट द्यायला काय हरकत आहे.