आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसंपादकीयसामाजिक
Trending

मुंबई मेट्रो-3 ची दिव्यांगांना २५% सवलत २३ नोव्हेंबरपासून लागू; वरिष्ठ पत्रकार दिपक कैतके यांच्या पाठपुराव्याला यश

विशेष प्रतिनिधी – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने दिव्यांग प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मेट्रो-3 मार्गिकेवर दिव्यांग प्रवाशांसाठी जाहीर केलेली २५ टक्के सवलत येत्या रविवार, २३ नोव्हेंबरपासून लागू होत आहे. दीड महिना उलटूनही प्रत्यक्षात ही सवलत सुरू न झाल्याने दिव्यांग प्रवाशांमध्ये वाढत चाललेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

एमएमआरसीच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सवलत प्रणालीत समाविष्ट करण्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया सध्या सुरू असून आवश्यक अंतिम चाचण्या पूर्ण होताच ही सवलत संपूर्ण मेट्रो प्रणालीमध्ये प्रभावीपणे लागू केली जाईल. सवलत सुरू करताना कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये म्हणून सर्व प्रक्रिया युद्धपातळीवर केली जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दिव्यांग प्रवाशांना हक्काची सुविधा मिळावी यासाठी वरिष्ठ पत्रकार, रुग्णमित्र आणि दिव्यांग कार्यकर्ते दिपक कैतके यांनी गेल्या काही आठवड्यांत सातत्याने पाठपुरावा केला होता. मेट्रो-3 सुरू झाल्यापासून दिव्यांगांना सवलत लागू न झाल्याचा मुद्दा त्यांनी ठळकपणे पुढे आणला. विविध स्तरांवर प्रशासनाशी सातत्याने संवाद साधत त्यांनी दिव्यांग प्रवाशांच्या अडचणी व मागण्या अधोरेखित केल्या. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून एमएमआरसीने सवलत लागू करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

दरम्यान, सवलत लागू झाल्याने मुंबईतील हजारो दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दैनंदिन प्रवासाचा खर्च कमी होऊन मेट्रोवरचा विश्वास वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मेट्रो स्टेशनवरील सुविधा, लिफ्ट अकार्यक्षम राहणे आणि दिव्यांग अनुकूल व्यवस्था अपुरी असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मिळणारी ही सवलत दिव्यांग प्रवाशांसाठी मोठा सकारात्मक टप्पा ठरणार आहे.

दिपक कैतके यांचा निर्धार : दिव्यांगांसाठी पूर्ण सवलत मिळेपर्यंत लढा सुरूच

दिव्यांग प्रवाशांसाठी २५ टक्के सवलत लागू झाली असली, तरी “ही तर केवळ झांकी आहे… दिव्यांग व्यक्तींना मेट्रोमध्ये पूर्ण सवलत मिळेपर्यंत आणि मेट्रो प्रवास खरोखर दिव्यांग सुलभ होईपर्यंत लढा सुरू ठेवणार,” असा निर्धार दिपक कैतके यांनी व्यक्त केला.

दिव्यांगांच्या मूलभूत प्रवासाच्या अधिकारासाठी सुरू असलेला त्यांचा हा संघर्ष अजूनही सुरू असून, पूर्ण सवलत आणि दिव्यांग अनुकूल सुविधा उपलब्ध होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button